जागतिक बालतस्करी विरोधी दिनानिमित्त
जिल्ह्यात बालतस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम
चंद्रपूर, दि. 01 : जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त, रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन, गडचिरोली अंतर्गत चंद्रपूर येथील असेस टू जस्टिस प्रकल्पान्वये, जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेले ठिकाण जसे, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, बाजारपेठ, चंद्रपूर व बल्लारपुर ही शहरे आदी तालुक्यातील ठिकाणी बालतस्करी विरुद्ध जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी माहिती फलके, पत्रके वितरीत करुन तसेच घोषवाक्य देत प्रभात फेरी काढण्यात आली.
बालतस्करी विरुद्ध जनजागृती मोहिमेला बल्लारपूर स्टेशन प्रबंधक श्री. नंदनवार, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, रेल्वे पोलिस कर्मचारी प्रवीण गावडे यांच्यासह असेस टु जस्टीस प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक नरेश मॅकलवार, समुपदेशिका राणी मेश्राम, कम्युनिटी सोशल वर्कर पुनम साळवे, सोनल रामटेके, बालाजी जाधव, शशिकांत मोकाशे, समन्वयक अभिषेक मोहरले, समुपदेशिका दिपाली मसराम, किरण बोरा आदींची उपस्थिती होती.
रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन गडचिरोली अंतर्गत जिल्ह्यात असेस टू जस्टिस प्रकल्प अनेक दिवसांपासून शाळा, अंगणवाडी, पंचायत समिती क्षेत्रात तसेच घरोघरी जाऊन बालतस्करी व बालमजुरी विरुद्ध जनजागृती मोहीम राबवित आहे. विशेष म्हणजे, नागरीकांना बालतस्करी थांबवण्यासाठी शपथ देखील देण्यात येत आहे. बाल तस्करी आणि बालमजुरी विरुद्ध लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हे या मागचे उद्दिष्ट आहे.
बालतस्करीच्या बाबतीत सामान्य नागरीकांमध्ये जागरूकतेच्या अभाव असल्यामुळे बालतस्करी थांबवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. देशात बालशोषण किंवा मुलांची तस्करी रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. असेस टू जस्टिस प्रकल्पाचे संस्थापक श्री. देवगडे म्हणाले “आज अधिकाधिक नागरीक हरवलेल्या मुलांची तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत, हा एक मोठा बदल आहे. आम्ही तळागाळात सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेमुळे लोकांची मानसिकता बदलली आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, एक हा मोठा बदल आहे. शासन आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून मुलांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.