नागरिकांनो ! पूर ओसरल्यावर अशी घ्या काळजी
चंद्रपूर, दि.31 : सध्या पूर परिस्थितीमुळे चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बरीच गावे बाधीत झाली आहे. पूर ओसरल्यानंतर योग्य प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने खालील सुचना केल्या आहेत.
पूर ओसरल्यावर गावपातळीवर घ्यावयाची काळजी : ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. प्रत्येक जलस्त्रोतांचे पाणी नमुने नियमित प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात यावे. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावामध्ये ब्लिचिंग पावडरने डस्टिंग करण्यात यावे. दलदल व कचरा साठलेल्या जागी मॅलेथिऑन 5 टक्केची धुरळणी करावी. प्रत्येक जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्यात यावे. पूर ओसरल्यानंतर संपूर्ण गावातील व नाल्यातील पाणी वाहते करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळील परिसर स्वच्छता करावी.
गावातील नागरिकांनी पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची काळजी :
घरात पिण्याचे पाणी घेतांना शक्यतो निर्जंतुकीकरण केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पावसाळ्यातील दिवसात 20 मिनिटे उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी घेतांना द्विपदरी कपड्याने गाळून पाणी द्यावे. घरातील पिण्याचे पाणी उंच जागेवर ठेवावे. पाणी घेण्यासाठी ओरघड्याचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचा (क्लोरीन द्रावण) व जीवन ड्रॉप चा वापर करावा. पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराजवळील डबके बुजवावे. घराशेजारी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
किटकजन्य आजारावर करा मात : साधारणत: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया,जे.ई. हे आजार प्रामुख्याने वाढतात. आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे डासाच्या घनतेत वाढ होते. पावसाळ्यात घराभोवती व परिसरात पाण्याचे डबके तयार होतात. या डबक्यातच डास अंडी टाकतात व डासाची उत्पती होऊन डास घनता वाढते. डेंग्यू, मलेरिया साथीच्या आजारांना रोखायचे असेल तर काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपचार आहे. यंदा ही साथ वेळीच रोखण्यासाठी नागरिकांनी आतापासून सावध राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पावसामुळे रहिवासी परिसर, गोडाऊन, मोकळ्या जागा, खड्डे या ठिकाणी साठणारी पाण्याची डबकी वेळोवेळी नष्ट करा. पाणी वाहते करा किंवा शक्य नसेल तर ऑइल, केरोसिनचे दोन – चार थेंब नियमित टाका आणि डासाची पैदास टाळावी. पाण्याची सर्व भांडी हवाबंद कापडाने झाकावीत. पक्षी, गुरांच्या पाण्याची भांडी साफ करावीत. घरातील कूलर, फ्रीजचे ट्रीप पॅन नियमित साफ करा. एडिस इजिप्ती या डासा पासून डेंग्यूची लागण होते. हा मानवी वस्तीजवळ अधिक आढळतो. भांडी, निरुपयोगी टायर, फुलदाण्या, नारळाच्या करवंडया यासह अन्य ठिकाणी पाणी साठून राहिल्यास एडिस इजिप्ती या डासाची पैदास होते. पावसाळ्यात ही पैदास झपाट्याने होते. त्यामुळे घर, इमारत, परिसरातील साठलेल्या पाण्याची ठिकाणे रिकामी करावी. ज्या ठिकाणी पाणी साचून अळ्या तयार होण्याची भीती आहे, अश्या वस्तु काढून टाकाव्यात.
दरम्यान घराबाहेर पडतांना किंवा घरात पूर्ण अंग झाकतील, असे कपडे घालावेत. डास चावू नये म्हणून डासरोधक मलम, अगरबत्ती, ई. चा वापर करावा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी. अडचणीच्या ठिकाणी किंवा डासाची पैदास होते, अशा ठिकाणी जाणे टाळावे. कुंड्या मध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असेही आवाहन जि.प.आरोग्य विभागाने केले आहे.