देशभरात ‘ओबीसी असंतोषा‘चा उद्रेक होणार–हेमंत पाटील
ओबीसीच्या जनगणेची मागणी करणाऱ्या ‘इंडिया‘चे आभार
मुंबई, २६ जुलै २०२३
देशभरात बहुसंख्यांक असून देखील विकासाच्या मुख्य प्रवाहापासून बराच दूर असलेला इतर मागासवर्गीय समाज (ओबीसी) संवेदनशील आहे.गत अनेक वर्षांपासून ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे समाजाच्या असंतोषात वाढ होत आहे.या असंतोषाच्या उद्रेकाचा सामना आता सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना करावा लागेल,असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करन्पशनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.२६) केले.नुकतीच बंगळुरू येथे देशभरातील विरोधी पक्षांची बैठक संपन्न झाली.या बैठकीत विरोेधकांनी त्यांच्या आघाडीला ‘इंडिया’ नाव दिले.या बैठकीदरम्यान विरोधकांनी ‘ओबीसी जनगणना व जातनिहाय जनगणना’ करण्याचा ठराव पारित करीत तशी मागणी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे.या मागणीचे स्वागत करीत पाटील यांनी ‘इंडिया’चे आभार मानले.
या अनुषंगाने आता देशभरातील ओबीसींची वज्रमुठ तयार करण्याचे कार्य केले जाईल, असे प्रतिपादन पाटील यांनी केले.गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी व जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावर देशभरातील ओबीसी संघटना,कार्यकर्ते, नेते व विद्वान, बुद्धीमान वर्ग घटनात्मक मार्गाने मागणी रेटून धरत आहे.त्याचा परिपाक म्हणजे देशातील विरोधकांना या मागणीची दखल घ्यावी लागली.देशभरातील ओबीसी असंतोषाला संघटीत करण्याचे कार्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केले.
एप्रिल महिन्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सामाजिक न्याय परिषदेत कॉंग्रेससह डावे, मुस्लिम तसेच जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी हजेरी लावत ‘फेडरल इंडिया’, ‘जातनिहाय जनगणना’ विषयावर चर्चा घडवून आणली, मार्गदर्शन केले आणि ठराव पारित केले.देशपातळीवर संघटित ओबीसींच्या असंतोषाला दिशा देण्याचा हा बहुदा पहिलाच प्रयोग होता.याच प्रयोगाची पुर्नरावृत्ती बंगळुरूत दिसून आली. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमधून ‘इंडिया’ या असंतोषाचे जनक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.