जिल्ह्यात ‘असेस टू जस्टीस’ प्रकल्पातंर्गत बालविवाह मुक्त भारत अभियान
चंद्रपूर, दि. 25 : नोबल पारितोषिक विजेते कैलाश सत्याथी चिल्ड्रेन फाउंडेशन दिल्ली, (युएस) व रुरल अँड अर्बन डेव्हलपमेंट युथ असोसिएशन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात असेस टू जस्टीस प्रकल्पाच्या माध्यमातून बालविवाह मुक्त भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
त्यासोबतच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 अंतर्गत बळी पडलेल्या पीडित बालकांना मानसिक व भावनिक समुपदेशन, कोर्ट केसेसमध्ये सहकार्य करणे, पोक्सो पीडित बालकांना मदत करणे, बालविवाह प्रतिबंध कायद्यात बालकांचे संरक्षण, बालकामगार संरक्षण कायदा, बालतस्करी आदी समस्याग्रस्त बालकांसाठी मदतीचे व पुनर्वसनाचे कार्य सदर संस्था करत आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावात सर्वेक्षण करून जिल्ह्यात प्रत्येक गावात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येते. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत बालविवाह मुक्त भारत करण्याकरीता अधिकारी व कर्मचारी शपथपत्र नोंदवून बालविवाह मुक्त भारत ही संकल्पना संपूर्ण देशभरात राबविण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कर्मचारी व प्रतिनिधी यांना या जनजागृती अभियानाशी यथार्थ सहयोग करावा, असे आवाहन असेस टू जस्टीस प्रकल्पाचे व्यवस्थापक काशिनाथ देवगडे यांनी केले आहे.