डिजिटल इंडिया सप्ताह २५ जुलै पासून नागरिकांना मिळणार केंद्रीय योजनांची माहिती
भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलै दरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. यात सर्वच नागरिकांना विविध ई-गव्हर्नन्स सेवांची माहिती मिळेल. आपल्या दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी हा सप्ताह सुरु होत असून, नागरिकांनी नोंदणी केल्यास त्यांना त्यांच्या ई-मेल व मोबाईल वर माहिती मिळेल, अशी माहिती ‘एनआयसी’ चे वरिष्ठ तांत्रिक संचालक शिवशंकर टेंभुर्णे यांनी दिली.
‘डिजिटल इंडिया’ सप्ताह भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखविणे, टेक स्टार्टअपसाठी सहयोग, व्यवसायाच्या संधी शोधणे व पुढील पिढीला प्रेरणा देण्यासाठी आहे. नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवाबद्दलची माहिती देण्यासाठी व त्यांनी आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जाईल. नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या वेबलिंकवर नोंदणी करणे गरजेचे आहे. याकरिता https://gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी ची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे किंवा https://www.nic.in/diw2023-reg या लिंकचा नोंदणीसाठी वापर करावा व जिल्यातील अधिकाधिक नागरिकांनी नोंदणी करावी व ई-गव्हर्नन्स सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. टेंभुर्णे यांनी केले आहे.