डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांपासुन सावध रहा

डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांपासुन सावध रहा

एक दिवस ‘ कोरडा दिवस ‘ पाळा

चंद्रपूर महानगरपालिकेचे आवाहन

 

चंद्रपूर १० ऑगस्ट – पावसाळ्यात अनेकदा डेंग्यू-मलेरिया व इतर कीटकजन्य आजारांचे निदान लवकर न झाल्याने हे आजार बळावतात आणि प्रसंगी प्राणघातकही ठरू शकतात. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया (हिवताप) या सारख्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी व त्यांना प्रतिबंध करण्यासाठी चंद्रपूर महापालिका आरोग्य यंत्रणेद्वारे उपाययोजना करण्यात येत असुन नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे तसेच आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणुन पाळण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

पावसाळ्याचे दिवस पाहता आपल्या परीसरात डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डासांची उत्पत्ती टाळणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साचतात. अशा डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पावसाळ्यात डासांमुळे होणारे रोगांचे प्रमाण वाढते. त्यामुळे घरांच्या भोवताली डबकी साचणार नाहीत याची काळजी घ्यावी. याचबरोबर डासांना प्रतिबंध करतील अशा उपायांचा वापर घरात करावा. ताप आल्यास दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवावे.

डेंग्यू रोगाचा डास हा स्वच्छ पाणी व काही दिवस साठवलेल्या पाण्यात फोफावणारा असल्याने आठवड्यातून एकदा तरी पाण्याची भांडी रिकामी करून घासून पुसून स्वच्छ करून ठेवावीत तसेच पाणी भरलेली भांडी घट्ट झाकून ठेवावीत. घर व परीसरातील पाणी साठ्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतल्यास आपण व आपल्या कुटुंबियांना याचा निश्चितच फायदा होईल.

डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु सर्वसामान्यांना या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

 

 

 

आपल्या परीसरात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुढील गोष्टी अवश्य करा –

 

१. डेंग्यूचा मच्छर हा स्वच्छ पाण्यात अंडी देणारा असतो त्यामुळे स्वच्छ पाणी साठवून ठेऊ नका.

२. घरी असलेल्या फ्रिजची टॅंक हमखास साफ करा.

३. एकदा भरलेले कुठलेही पाणी सात दिवसापर्यंत साठवून ठेवण्यात येऊ नये.

४. पिण्याच्या पाण्याचा परिसर स्वच्छ ठेवणे व पाणी अशुध्द होऊ नये याची काळजी घ्या.

५. परिसरात कचरा साठू देऊ नका.

६. डास अळी आढळणारी पाण्याची भांडी रिकामी करा.

७. सोसायटी मधे राहणाऱ्या रहिवाश्यांनी जमिनीखालील व जमिनीवरील टाक्या स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

८. आठवड्यातून एक दिवस सर्व पाण्याची भांडी रिकामी करून कोरडा दिवस पाळून स्वतःचे व कुटूंबाचे आरोग्य रक्षण करा ,सतर्क राहुन स्वतःची काळजी घ्या.