आस्थापनेकडील रिक्त पदांसाठी विभागीय स्तरावर इंडस्ट्रियल मिटचे आयोजन
Ø रिक्त पदांविषयी करार करणेबाबत आवाहन
चंद्रपूर, दि. 23 : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. यासाठी रोजगार मेळावा योजना ही अधिक प्रभावी माध्यम आहे. सदर मेळाव्यात उद्योजक व नोकरी इच्छुक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडील रिक्त पदांसाठी मुलाखती आयोजित करून तात्काळ नोकरी उपलब्ध करून देण्यात येते.
याअनुषंगाने, जिल्ह्यातील ज्या आस्थापनेकडे जास्तीत जास्त रिक्त पदे उपलब्ध आहे त्यांच्यासाठी विभागीय स्तरावर इंडस्ट्रियल मिटचे आयोजन करण्यात आले आहे. याचा उद्देश राज्यातील सर्व भागातील उमेदवारांना रोजगाराच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध देणे हा होय. जिल्ह्यातील नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सी आदी समवेत करार करण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी ज्या आस्थापनेत कामगाराची जास्तीत जास्त आवश्यकता आहे व सामंजस्य करार करण्यास इच्छुक आहे, अशा सर्व आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हॉल क्र. 5 व 6 येथे कार्यालयीन दिवशी येऊन भेट द्यावी. अथवा 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे, आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.