ओम राईस मिलवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
भंडारा, दि. 21 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यामध्ये पणन हंगाम 2022-23 करीता जिल्ह्यातील 221 राईस मिलर यांचेकडून भरडाईचे काम सुरु आहे. जिल्ह्यामध्ये पणन हंगाम 2022-23 मध्ये 42 लाख 50 हजार 816.40 क्विंटल धानाची खरेदी झालेली आहे. धानाची भरडाई करुन राज्यातील विविध जिल्ह्यांना लक्ष्यनिर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्यासाठी तांदूळ पाठविला जातो.
ओम राईस मिल, खरबी ता.तुमसर यांना तांदूळ जमा करण्याकरीता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, तुमसर येथील नियतन देण्यात आलेले होते. या गोदामात राईस मिलर यांचेकडून तांदूळ जमा झाल्यानंतर गुणवत्ता तपासणी करुन तो मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र “ग” परीमंडळ कांदीवली येथे तांदूळ जाणार होता. परंतू ओम राईस मिल, खरबी यांनी दिनांक 19 मे 2023 रोजी तांदूळ गोदामात आणून त्याची गुणवत्ता तपासून न घेता परस्पर मुंबई- ठाणे शिधावाटप क्षेत्र “ग” परीमंडळ कांदीवली येथे पाठविण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांना मिळताच त्यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाचे पथक गठीत करुन याची सविस्तर चौकशी केली. चौकशीअंती ओम राईस मिल, खरबी हे दोषी आढळून आल्यावरुन ओम राईस मिल, खरबी यांचेसोबत भरडाईसाठी केलेला करारनामा रद्द करण्यात आलेला असून करारनाम्यापोटी जमा केलेली अनामत रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.
तसेच सदर भरडाई केंद्र पणन हंगाम 2022-23 करीता व पुढील दोन वर्षाकरीता रद्द करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम, तुमसर येथील गोदाम व्यवस्थापक हेमंत गेडाम व मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र “ग” परीमंडळ कांदीवली येथील उचल प्रतिनिधी दिपक टिकस यांचेविरुध्द विभागीय चौकशीचा प्रस्ताव संबंधीतांच्या वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये सर्व राईस मिलर्सना नियमानुसार काम करण्याबाबत सक्त सूचना पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी कळविले आहे.