वर्षपूर्ती : विशेष वृत्त 10 लक्ष 26 हजार ज्येष्ठ नागरिकांचा लालपरीने मोफत प्रवास

वर्षपूर्ती : विशेष वृत्त

75 वर्षांवरील 10 लक्ष 26 हजार

ज्येष्ठ नागरिकांचा लालपरीने मोफत प्रवास

 

Ø महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अमृत ज्येष्ठ नागरिक योजना

 

चंद्रपूर, दि. 20 : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे 75 व्या वर्षात पदार्पणानिमित्त राज्य शासनाने 16 ऑगस्ट 2022 पासून ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना म.रा. परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 100 टक्के सवलत देण्यात येते. गत वर्षभरात चंद्रपूर जिल्ह्यातील 75 वर्षांवरील 10 लक्ष 26 हजार 11 ज्येष्ठ नागरिकांनी लालपरीने मोफत प्रवास केला आहे.

 

आजही ‘लालपरी’ ही ग्रामीण भागातील मुख्य जीवनवाहिनी मानली जाते. केवळ तालुक्याच्याच ठिकाणी नव्हे तर शेवटच्या गावखेड्यापर्यंत एस.टी. महामंडळाची बस पोहचली असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने बसने प्रवास करीत असतात. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जिल्ह्यात चंद्रपूर, राजुरा, चिमूर आणि वरोरा असे चार आगार आहेत. सप्टेंबर 2022 ते मे 2023 या 9 महिन्यात चारही आगार मिळून एकूण 10 लक्ष 26 हजार 11 नागरिकांनी (75 वर्षांवरील) अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेऊन मोफत प्रवास केला आहे. यात चंद्रपूर आगारातील 2 लक्ष 72 हजार 576 नागरीक, राजुरा आगारातील 1 लक्ष 85 हजार 413, चिमूर आगारातील 3 लक्ष 38 हजार 416 आणि वरोरा आगारातील 2 लक्ष 29 हजार 606 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

65 ते 75 वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के प्रवास सवलत तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 100 टक्के प्रवास सवलत लागू करण्यात आली आहे. तसेच ही सवलत भविष्यातही रा.प. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या बसेसकरीता सुध्दा लागू राहणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना ही महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत अनुज्ञेय आहे. सदर सवलतीकरीता संबंधित व्यक्तिचे आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र / राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना दिलेली ओळखपत्र (त्यावर फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता अनिवार्य आहे), पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र व रा.प. महामंडळाद्वारे देण्यात येणारे स्मार्टकार्ड, डीजीलॉकर, एम.आधार ही कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतात.

 

ज्या ज्येष्ठ नागरिकांना म.रा. परिवहन महामंडळाचे स्मार्टकार्ड प्राप्त झाले नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांना सद्यस्थितीत ग्राह्य धरण्यात येणा-या ओळखपत्राच्या आधारे सवलत देण्यात यावी. वयाचा योग्य पुरावा असताना कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला सवलत नाकारण्यात येऊ नये, अशा सक्त सुचना सर्व वाहकांना देण्यात आल्याचे रा. परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सूतवणे यांनी कळविले आहे.