मका खरेदी : शेतकरी नोंदणीसाठी 15 जुनपर्यंत मुदतवाढ
चंद्रपुर, दि. 12 : पणन हंगाम 2022-23 रब्बी (उन्हाळी) मधील शासकीय आधारभुत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणीसाठी 20 मे 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु शेतकरी हितासाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून 15 जून 2023 पर्यंत शेतक-यांना मका खरेदीसाठी नोंदणी करता येणार आहे.
मका खरेदी नोंदणीसाठी शेतक-यांनी सेवा सहकारी संस्था, पाथरी (ता. सावली), कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा आणि कोरपना तालुका खरेदी विक्री संस्था (गोंडपिपरी), ता. गोंडपिपरी येथील केंद्रावर स्वत: हजर राहावे. शेतकरी नोंदणी करतांना हंगाम 2022-23 पासून ज्या शेतक-याचा सातबारा आहे, तसेच ज्या शेतक-यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतक-याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी कळविले आहे.