राजुरा तहसील कार्यालयासमोर कापसाची होळी

राजुरा तहसील कार्यालयासमोर कापसाची होळी

चंद्रपूर :- राजुरा तहसील कार्यालयासमोर कापसाची होळी करत वंचित बहुजन आघाडीने आज गुरुवारी सत्याग्रह आंदोलन केले आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वंचितचे चंद्रपुर जिल्ह्यातील नेते तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे वंचितचे उमेदवार भूषण फुसे मैदानात उतरले असून त्यांच्या नेतृत्वाखाली हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.  दुर्गापूर जंगलात आढळला वाघाचा मृतदेह

राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बी बियाणांचा काळा बाजार सुरू असून कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे, तसेच बी बियाणे, फवारणीची औषध व खतांच्या किमतीत शासनाने भरमसाठ वाढ केली असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत नसून वंचित बहुजन आघाडीने रोष व्यक्त करत तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढून शासनाच्या धोरणांचा निषेध केला. तसेच तहसील कार्यालय परिसरात कापूस जाळून कापसाची होळी करण्यात आली. बोगस बी बियाणे उत्पादन व विक्री करणाऱ्यावर कारवाई करा, शेतकऱ्यांना बी बियाणे 50 टक्केवर उपलब्ध करून द्या, अन्यथा व्यापाऱ्यांच्या गोडावूनला टाळे ठोकून तीव्र आंदोलन करू असा इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे वंचितचे उमेदवार भूषण फुसे यांनी दिला आहे.

यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, तालुका अध्यक्ष सुशील मडावी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, कार्याध्यक्ष सुभाष हजारे, गोंडपीपरी तालूका निरीक्षक भगीरथ, चनाखा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश दुर्योधन, राजूरा शाखाध्यक्ष वैशाली दुबे, जिल्हा महिला सल्लागार सत्याबाभा भाले, तुळसाबाई खडसे, युवा कार्यकर्ते अभिलाष परचाके, श्रावण कुलमेथे यांच्यासह वंचितच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राजूरा तहसीलदार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट न घेतल्याने दोन तास आंदोलनकर्ते ताटकळत राहिल्याने काही काळ तहसील कार्यालयात वातावरण तापले होते, कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या ठोकला, त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तहसीलदार हरीश गाडे यांनी भेट घेत, मागण्या वरिष्ठांना पाठवून योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत झाले.