पावसाळ्यात धरणातील संभाव्य विसर्गाबाबत जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवा – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
भंडारा, दि. 7 : पावसाळयात वेळोवेळी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे गोसेखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. मान्सूनचे आगमन होण्याबाबतचे हवामान खात्याचे संकेत असून सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळी वाढत असते. त्यामुळे धरणातून विसर्ग सोडतांना किमान 4 तास पूर्वी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
काल पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी प्रकल्पातील पाण्याची महत्तम पातळी तसेच प्रकल्पातील पाणी व्यवस्थापनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्याचबरोबर भंडारा ते गोसेखुर्द धरण दरम्यान पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या संभाव्य बाबी व ठिकाणांची पाहणी करण्याची सूचना श्री. कुंभेजकर यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास तसेच धरणावरील श्री. भलावे, श्री. मसराम, श्री. छन्नम हे अधिकारी व श्री. झाडे, श्री. पाटील, श्री. क्षीरसागर हे कर्मचारी उपस्थित होते.