उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा- प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

गडचिरोली, दि.07: तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरिरावर होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमान वाढ सहन करता येऊ शकते. पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा वातावरणात काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक असंही म्हटंल जातं. अनेक दिवस सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो. त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात होय.
उष्माघाताची लक्षणं- शारीरिक तापमान 104 डिग्री पेक्षा जास्त, चक्कर येणे, मळमळ, उलटया होणे, पोटात कळ येणे, डोकेदुखी, दरदरुन घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे अशी आहेत. त्वचा गरम आणि कोरडी होते. नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, हात आणि पायात आकडी (क्रांप्स) येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होतो, शरीरातील पाणी कमी होणे.

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना- सर्वप्रथम व्यक्तिला सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे. शरीर ओले करुन पंखा सुरु ठेवावा, शॉवर दिल्यास जास्त चांगले, पुरेसे पाणी प्या, तहान लागलेली नसली तरी सुद्धा दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावेत. घराबाहेर जातांना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करण्यात यावा, प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर टोपी, छत्रीचा किंवा ओल्या कपडयाने डोके, मान, चेहरा झाकण्यांत यावा. उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबुपाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करण्यात यावा, लघवीचा रंग जास्त पिवळसर झाला किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास पाणी व वर नमुद केलेल्या पेय पदार्थाचे प्रमाण वाढवावे, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. सुर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे, झुडपांचा वापर करण्यात यावा. दुपारी 12 ते 4 या वेळात उन्हात काम करणारे मजुर, शेतमजुर, विटाभट्टी व बांधकाम करणारे मजुर यांनी उन्हात काम करणे टाळावे. वरीलप्रमाणे काळजी घेतल्यास बऱ्याच प्रमाणात उन्हामुळे होणारे आजार टाळता येतील, असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.