जिल्ह्याची आर्थिक प्रगती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करा
Ø ‘जिल्हा विकास आराखडा’ आढाव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
Ø क्षेत्रनिहाय नियोजनाचा आढावा घेणार
चंद्रपूर, दि. 2: एकंदर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनाने ठरविलेल्या उद्दिष्टानुसार जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनात जिल्ह्याची आर्थिक प्रगती वाढविणाऱ्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात आयोजित ‘जिल्हा विकास आराखडा’ आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की विकसित जिल्हा बनण्यास सक्षम करणाऱ्या विकासाभिमुख दृष्टीकोनाची रूपरेषा तयार करावी. जिल्ह्यातील इको सिस्टम सपोर्टवर आधारित वृद्धीची उपक्षेत्रे ओळखून ती मजबूत करण्यासाठी कालबद्ध कृती योजना विकसित करण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सद्यस्थितीवरून भविष्यातील अपेक्षित स्थिती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक विभागाकडून क्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजनाचा नियमित आढावा घेण्यात येईल, त्यानुसार प्रत्येक विभागाने नियोजन सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला विविध विभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.