जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक
भंडारा, दि. 2 : तरुणाई मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाच्या आहारी जात असल्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडत आहे. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी सुध्दा सावध राहणे गरजेचे असून त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे. याबाबत शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. बदलत्या काळानुसार पार्सलमध्ये अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. त्याअनुषंगाने कुरियर व डाक विभागाने संशयित पार्सलची पडताळणी करावी व स्थानिक गुन्हे शाखेला संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी केले.
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात शेतामध्ये गांजाची लागवड होणार नाही, याकडे कृषी विभागाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
तरुणाईसमोर भेडसावणारी एकमेव समस्या अंमली पदार्थ असून त्याबाबत पोलीस प्रशासनाद्वारे उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबत जिल्हास्तरीय समिती सुध्दा गठित करण्यात आली असून यात पोलीस विभागासह महसूल, कृषी, सिमा शुल्क, आरोग्य, राज्य उत्पादन, पोस्ट विभाग व अन्न व औषध विभागाचा समावेश आहे. पोलीस विभागामार्फत विविध अंमली पदार्थांचे सेवन, बाळगणे, वाहतूक करणे आदींबाबत वेगवेगळ्या नियमानूसार कारवाई करण्यात येत आहे.