वनक्षेत्रामध्ये टसर रेशीम उद्योगाला चालना द्या – जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
भंडारा, दि. 31 मे, : जिल्ह्यामध्ये टसर रेशीम उद्योगांतर्गत टसर कोष ते कापड निर्मिती पर्यंतची प्रक्रिया पारंपरिक पध्दतीने केली जाते. भंडारा जिल्ह्यात ऐन व अर्जून वृक्षाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमणात उपलब्ध असून त्याचा वापर टसर किटक संगोपनासाठी व्हावा. त्याअनुषंगाने संबंधित विभागांनी आपसात समन्वय साधून नियोजन करावे. वन विभागाच्या मदतीने वनक्षेत्रामध्ये टसर रेशीम उद्योगाला चालना देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकरी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील शेतऱ्यांच्या सभा व भेटी घेवून तूती लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे. भंडारा तालुक्यातील खापा, बासोरा व गराडा खुर्द येथील वन विभाग, रेशीम विभाग व केंद्रीय रेशीम मंडळ यांनी संयुक्तरित्या सर्वेक्षण करुन निवडलेले वनक्षेत्र टसर लाभार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावे. तसेच लाभार्थ्यांना प्रशिक्षण देऊन गावातच रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे ते म्हणाले.
जिल्ह्यातील निष्टी या गावात टसर रेशीम उद्योग पारंपरिक पध्दतीने होत असल्याने तेथे वन विभागामार्फत ऐन व अर्जून वृक्षाची लागवड करुन गॅप फिलींग करण्यात यावी. तसेच बफर झोन वनक्षेत्रात नैसर्गिकरित्या किटक संगोपन करण्यासाठी वन विभागाने निवडलेल्या वनक्षेत्रास रेशीम विभाग, वन विभाग व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे भेट देऊन त्वरीत सर्वेक्षण करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या.