जलयुक्त शिवार अभियानाला गांभिर्याने घ्या हलगर्जी केल्यास कारवाईचा ईशारा– जिल्हाधिकारी
भंडारा, दि. 26 मे : जिल्हयात जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा कार्यान्वित झाला असून या अभियानातील कामात हलगर्जी केल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत दिला.
शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार टप्पा-2 ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे गांभिर्य यंत्रणांनी लक्षात घेवून पावसाळयापुर्वी या कामांची अंमलबलावणी अपेक्षीत आहे. मात्र अनेक ठिकाणी मंजूर कामांना सुरवात झाली नाही. प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडे पोहोचले नाही, ही गंभीर बाब आहे. वन विभाग, कृषी विभाग, महसूल, जलसंधारण यांचा महत्वाचा सहभाग आहे. तालुकानिहाय कामाचा आढावा या सभेत घेण्यात आला.
जलसंधारण क्षेत्रात भूजलस्तर वाढल्याबाबत राज्याच्या कार्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्राला नुकतेच पुरस्कृत केले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार-2 मध्ये कमी पाऊस पडणाऱ्या ठिकाणी ही योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यामध्ये समीतीने निवडलेल्या शंभर गावांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कामांच्या संख्येत वाढ होऊ शकते.
आज झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व तलावांचे खोलीकरण, नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण बंधारा बांधकाम या कामांना गती देण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी बी.वैष्णवी, उपवनसंरक्षक राहूल गवई, प्रकल्प संचालक श्री.बोंन्द्रे कार्यकारी अभियंता अनंत जगताप, कृषी विभागाचे अधिकाऱ्यासह जिल्हयातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.