कौशल्य विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम
गडचिरोली,17:राज्यातील शासकीय/निमशासकीय तसेच इतर संस्थामधील पदभरतीतील आदिवासी उमेदवारांचा टक्का वाढावा याकरीता राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या प्रशिक्षण केंद्राची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली आहे. 1994 पासून 2432 आदिवासी उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यत 329 उमेदवार हे शासनाच्या विविध खात्यात नोकरी करत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC स्पर्धा पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समितीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षाबाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम या केंद्रामार्फत विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे शालांत परीक्षा उर्त्तीण प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड (EMPLOYMENT CARD) असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु. 1000/- (एक हजार रुपये) विद्यावेतन दिले जाते तसेच इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता हे चार विषय शिकविण्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकाची नियुक्ती केल्या जाते. वर्षभरात एकूण तीन सत्राचे आयोजन केले जाते. एप्रिल, ऑगस्ट व डिसेंबर असे सत्र चालु होण्यापुर्वी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली जाते. तसेच एकात्मिक प्रकल्प आदिवासी कार्यालयाकडून उमेदवारांची यादी मागवून घेतल्या जाते. त्यानंतर उमेदवारांची मुलाखती मार्फत एका सत्राकरीता 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते अशा प्रकारे ही योजना गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येते. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.