शिक्षण विभागांच्या भागधारकांची कार्यशाळा संपन्न

शिक्षण विभागांच्या भागधारकांची कार्यशाळा संपन्न

· जिल्हा विकास आराखड्यासाठी चर्चा

 

भंडारा, दि. 16 मे : जिल्हा शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक/ योजना) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, भंडारा यांचे संयुक्तपणे जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हयातील भागधारकांची कार्यशाळा काल जिल्हा नियोजन कार्यालय येथे जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर यांचे उपस्थितीत संपन्न झाली.

 

या बैठकीस प्रामुख्याने शिक्षणाधिकारी प्राथमिक व योजना रविंद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर आणि शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा स्तरावर उपक्रमशिल यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यात येणारी शिखर संस्था (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) च्या वतीने गुलाबराव राठोड, जेष्ठ अधिव्याख्याता व इतर अधिव्याख्याता उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, अपंग समावेशीत शिक्षण योजना व मॅजिक बस फाऊंडेशनचे प्रतिनीधी उपस्थित होते. या कार्यशाळेचे सादरीकरण सहायक शिक्षक तथा प्रशिक्षक देवानंद भरत यांनी केले.

 

जिल्हा विकास आराखडा तयार करतांना शाश्वत ध्येयांमध्ये सर्वांना शिक्षण व गुणवत्तपुर्ण शिक्षण हे महत्वाचे उद्दिष्ट आहे. शिक्षण क्षेत्रात असलेली जिल्हयाची सद्यस्थिती, जिल्हयाचे व्हिजन व प्रमुख भागधारक म्हणजे शैक्षणीक क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती यांच्या सोबत सल्लामसलत करुन आवश्यक ती माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.

 

कौशल्य विकास, तंत्र शिक्षण, उद्योग, रेशीम उद्योग, खादी व ग्रामउद्योग, कृषि, माहिती कार्यालय यांची भागधारकांसोबत कार्यशाळा झालेली आहे. जिल्हा विकास आराखड्यासंदर्भात चार बैठका झाल्या असून जुन महिन्याच्या अखेरपर्यंत विविध विभागांशी संवाद साधून हा विकास आराखडा अंतीम करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी देखील जिल्हयाच्या विकास आराखडयासाठी सूचना नियोजन कार्यालयात dpobhandara@gmail.com या ई-मेलवर लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन प्र. जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर यांनी केले आहे.