पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही याबाबत वेकोली व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
Ø राजुरा-कोरपणा महामार्गाचे काम मान्सूनपुर्वी पूर्ण करण्याचे निर्देश
चंद्रपूर, दि. 12: आपत्ती व संभाव्य पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
बैठकीला उपविभागीय अधिकारी, महानगरपालिकेचे उपायुक्त, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक, वेकोली, वणी, मांजरी व चंद्रपूरचे अधिकारी, तहसीलदार तसेच भद्रावती, राजुरा व सीएसटीपीएसचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सन 2022 मध्ये आलेल्या पुराच्या कारणांचा आढावा घेतला. भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरीता वेकोली, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे पदाधिकारी यांना निर्देश दिले. त्यासोबतच वर्धा नदीच्या किनाऱ्यापासून 20 मीटर अंतरावरील ओव्हर बर्डनचे डम्प मान्सूनपूर्वी हटविण्यातबाबत सूचना दिल्या. जेणेकरून, नदीप्रवाहात अडथळे निर्माण होणार नाही. तसेच यापुढे डम्प टाकताना ते ब्लूलाईन व रेडलाईनच्या मध्ये येणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
वर्धा नदीवर ब्ल्यूलाईन व रेडलाईन बाबतचे आराखडे तयार करण्याच्या सूचना जलसंपदा विभागास दिल्या. राजुरा-कोरपणा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. जर महामार्गाचे काम मान्सूनपूर्वी पूर्ण झाले नाही तर मान्सून कालावधीमध्ये पावसाचे पाणी महामार्गाशेजारील शेतांमध्ये जाऊन शेत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजुरा ते कोरपणा महामार्गाचे काम मान्सूनच्या अगोदर पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिल्या.