शेतकऱ्यांनी जैविक कीटकनाशकांचा वापर वाढवून
उत्पादन खर्च कमी करावा
Ø कृषी विभागाचे आवाहन
चंद्रपूर, दि. 03 : पिकामध्ये किड व रोग नियंत्रणासाठी जैविक निविष्ठाचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होवून उत्पन्न वाढते. रायझोबियम जिवाणू प्रति हेक्टरी प्रति वर्ष 50 ते 100 किलो नत्र स्थिर करतात. ॲझोटोबॅक्टर जिवाणू प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो नत्र स्थिर करतात, पीएसबी प्रति हेक्टरी 15 ते 20 किलो स्फुरद मुक्त करतात. निळे हिरवे शेवाळ प्रति हेक्टरी प्रति वर्ष 25 ते 30 किलो नत्र स्थिरीकरण करतात. तूर, कापूस व हरभरा 4 ग्रॅम प्रति किलो पेरणीच्या वेळी बियाण्यास ट्रायकोडर्मा बिजप्रक्रीया केल्यास मर रोगावर नियंत्रण ठेवता येते. नत्र स्थिरीकरणामुळे उत्पादनात वाढ होवून रासायनिक खताचा वापर कमी होणार आहे. निसर्गामध्ये सर्वसाधारपणे 97 टक्के मित्रकिडी असुन 3 टक्के शत्रुकिडी आहेत. पिकांच्या विविध किडीवर उपजिवीका करणारे मित्रकिडी रासायनिक किटकनाशकांच्या अती वापरामुळे नष्ट होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक किटकनाशकांचा वापर वाढवुन उत्पादन खर्च कमी करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
रासायनिक खत 50 किलोच्या 1 युरीया बॅगमध्ये 23 किलो नायट्रोजनचे प्रमाण असते. 1 हेक्टर भात पिक लागवड केलेल्या जमीनीकरीता 100 किलो नत्राची आवश्यकता असते, त्याकरिता युरिया खताचे कमीत कमी 4 बॅग खरेदी कराव्या लागतात. याकरीता रू. 1064 खर्च येतो. जिवाणू खत ॲझोटोबॅक्टर वापरल्यास रू. 200 ते 250 खर्च येतो. त्यामुळे जैविक खताचा वापर केल्यास 25 ते 30 टक्के खर्चात बचत होते. जैविक खताच्या वापरामुळे जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपिकता टिकून राहते, पर्यावरणाचा समतोल राखला जातो. उपयुक्त जीवजंतू व मित्रकिडींना अपाय होत नाही. सेंद्रीय पदार्थ कुजण्यास मदत होते व जमिनीचा पोत सुधारतो. नैसर्गिक पध्दतीने अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. जमिनीत सोडलेल्या प्रतिजैविकांमुळे पिकाची रोग व किड प्रतिकारशक्ती वाढते.
जैविक खतांमध्ये जमीन, पाणी व पिकांसाठी यासाठी अपायकारक अशी रसायने नसतात. जैविक खते तुलनेत स्वस्त असतात त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. जैविक खताचा शेतक-यांनी वापर करावा. त्यासाठी शेतक-यांनी जैविक निविष्ठा शासन मान्यता प्राप्त दुकान, कृषी विदयापीठे, शासकीय प्रयोगशाळा, कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून खरेदी करून पक्के देयक प्राप्त करून घ्यावे. कोणत्याही कंपनीकडून ऑनलाईन पध्दतीने जैविक निविष्ठा खरेदी करू नये. यामध्ये शेतक-यांची फसवणूक होवू शकते.
तरी, शेतकऱ्यांनी खरीप हंगामात जैविक निविष्ठाचा जास्तीत जास्त वापर करून उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.