राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हजारो कुटुंबियाना मिळाला दिलासा

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हजारो कुटुंबियाना मिळाला दिलासा

 

चंद्रपूर,दि. 24 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत चंद्रपुर जिल्ह्यात अंगणवाडी व शाळा ( शासकीय व निमशासकीय शाळा) तपासणी करिता एकूण 24 पथक कार्यरत आहेत. या कार्यक्रमाअंर्तगत 4 Ds ( Defect At Birth, Deficiencies, Diseases, Developmental Delays & Disabilities) आजाराच्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते असून तपासणीदरम्यान हृदयरोग आजाराच्या व इतर आजाराच्या बालकांची शस्त्रक्रियेकरिता निवड करण्यात येते.

 

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शाळा व अंगणवाडी मध्ये होणारी आरोग्य तपासणी गोरगरिब बालकांसाठी संजीवनी ठरत आहे. कार्यक्रमाअंतर्गत सन 2008 पासून मार्च 2023 अखेरपर्यंत एकूण 1029 बालकांची हृदय शस्त्रक्रिया व 5036 बालकांची इतर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून घेण्यात आली आहे. सन 2022-23 मध्ये एकूण 126 बालकांची हृदय शस्त्रक्रिया व 302 बालकांची इतर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच 18 एप्रिल रोजी 12 बालकांना हृदय शस्त्रक्रिया व 3 बालकांना इतर शस्त्रक्रियेकरिता आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय, सावंगी येथे भर्ती करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाअंर्तगत बालकांमध्ये आढळणा-या विविध आजाराचे निदान केले जात असले तरी हृदयरोग आजारासह 4 Ds च्या आजाराकरिता संदर्भात बालकांच्या उपचारावर विशेष भर देण्यात येते. या बालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांचेवर महागडे उपचार करणे त्याचे कुटुंबियाना शक्य होत नाही. अशा परिस्थीतीत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम या कुटुंबियासाठी संजिवनी ठरत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या या प्रयत्नामुळे सदर कुटुंबियामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

यापूर्वी बालकांमध्ये हृदय विकार उशिरा लक्षात येत असल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागत असे, परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामुळे दरवर्षी मोठया प्रमाणात अशा रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. या कार्यक्रमामुळे ब-याच बालकांना मोफत उपचार उपलब्ध होत असून हजारो कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, तसेच पथकाच्या प्रयत्नांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात येत आहे.