भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कर्करोग तसेच हृद्यरोग तज्ञांच्या सेवा सुरू· नागरिकांनी लाभ घ्यावा
भंडारा, दि. 21 : जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे राज्य शासनाच्या नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम तर्फे हृदयरोग, मूत्रपिंड रोग व सर्व कर्करोग तज्ञांची सेवा सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात ठराविक दिवशी तज्ञ आपली सेवा देतात. याप्रसंगी रुग्णांची तपासणी करून शक्य होणाऱ्या शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत होणार आहेत. ज्या तपासण्या किंवा शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात होणे शक्य नाही अश्या रुग्णांना नागपूर येथील विविध रुग्णालयात संदर्भित केले जाईल व त्या पच्यात सेवा जिल्हा रुग्णालयात मिळतील. सर्व कर्करोग तज्ञ बुधवार व शनिवार, हृदयरोग तज्ञ- बुधवार, किडनी रोग/ मूत्रपिंड रोग तज्ञ – सोमवार, गर्भाशय कर्करोग तज्ञ – शुक्रवारी सेवा देत असतात. ह्या सेवा मोफत असल्याने जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांनी केले आहे.
किडनीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या काही रुग्णांना नियमित डायलिसीस तज्ञा ची गरज पडते. ही व्यवस्था सामान्य रुग्णालयात उपलब्ध आहे. डायलिसिसकरिता काही रूग्णांना हातावर फिस्तुला बनवायची गरज पडत असते परंतु ही व्यवस्था भंडारा जिल्ह्यात उपलब्ध नसल्याने रुग्णांना नागपूरला जावे लागत होते. तरी परिस्थिती लक्षात घेऊन सामान्य रुग्णालय भंडारा यांनी पहिल्यांदाच फिस्तुलाची सोय मोफत उपलब्ध केलेली आहे तरी रुग्णांनी सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.