जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते
“महिलांसाठीच्या शासकीय योजना” पुस्तिकेचे विमोचन
गडचिरोली: आदिवासी बहुल, अतिसंवेदनशील व दुर्गम भागाने व्याप्त गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुस्तिका तयार करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “महिलांसाठीच्या शासकीय योजना” ही पुस्तिका तयार करण्यात आली. या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहचावी व गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त महिलांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा याकरिता गडचिरोली जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून पुस्तिका तयार केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक प्रकारच्या महिला सक्षमीकरण योजना राबविल्या जात आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कायद्याची अंमलबजावणी करीता एक दिवसीय आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत या पुस्तिकेचे विमोचन नुकतेच करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली चे सदस्य सचिव आर. आर. पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वर्षा मनवर, सामाजिक कार्यकर्ते श्रीमती सविता सादमवार उपस्थीत होते.सदर पुस्तकेमध्ये मलिांसाठीच्या शासकीय योजना यामध्ये प्रशिक्षण संबधित योजना, अर्थ सहाय्यीत योजना, वैयक्तीक लाभाच्या योजना, बचत गट योजना, आरोग्य विषयक योजना, यासंबधीत योजनेविषयीची संपुर्ण माहिती पुस्तिकेत दिली आहे. सदर पुस्तिकेच्या माध्यमातून महिलांना मोठया प्रमाणात फायदा होणार आहे.