पडोली चौकातील सुरक्षा उपाययोजनेसह विद्युतीकरण कामाचे भूमिपूजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते पडोली चौकातील सुरक्षा उपाययोजनेसह विद्युतीकरण कामाचे भूमिपूजन

शुद्ध पेयजल संयंत्राचेही लोकार्पण

 

चंद्रपूर, दि. 17 : गावातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

 

पडोली चौकातील सुरक्षा उपाययोजनेसह विद्युतीकरण कामाचे भूमिपूजन व शुद्ध पेयजल संयंत्राचे लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, नामदेव डाहुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, विद्युत उपकार्य अभियंता श्री. येरगुडे, सरपंच विकी लाडसे, अनिल डोंगरे, माजी सैनिक मनोज ठेंगणे, शोभा पिदुरकर, प्रदीप गंधारे, सागर गोविंदवार,अनुताई ठेंगणे आदी कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, पडोली चौक हा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या चौकात अपघात झाले असून यात दोघांना जीव गमवावा लागला. या दृष्टीने माजी सैनिक मनोज ठेंगणे यांनी उपोषण देखील केले. याची दखल घेत या मतदार संघाचा आमदार नसतानाही निधी कुठून उपलब्ध करून द्यायचा? याबाबत अभ्यास केला व 2016-17 मधील कायद्यान्वये सुरक्षा निधीतून 5 कोटी 21 लक्ष रुपये या चौकातील सुरक्षा उपाययोजनासह विद्युतीकरण करण्यासाठी मंजूर करून दिले. या कामाचे भूमिपूजन करतांना मला मनस्वी आनंद होत आहे. प्रस्तावित सर्व कामे गतीने व वेगाने व्हावे, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत.

 

रोड सेफ्टी मेजर्स, सिग्नल इन्स्टॉलेशन, रोड डिव्हायडर व फुल लाईट सिग्नल आदी उपाययोजनेसह जिल्ह्यात कुठेही नाही, असे काम येथे करावे. या चौकाचे सौंदर्यीकरण करून सीसीटीव्ही सिस्टीम, सौंदर्यीकरण व आवश्यक उपाययोजना कराव्यात. यासाठी योग्य नियोजन करा. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघातात दोष कोणाचा हे शोधणे सोयीस्कर होईल. यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यापूर्वी लखमापूर हनुमान मंदिरासाठी 60 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून पडोली येथे पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यासाठी निधी दिला जाईल, असे पालकमंत्री म्हणाले.

 

पडोली येथील चौकात झालेल्या अपघातात मुलगा गमाविलेल्या वीर बहादुर सिंग आणि रोशनी सिंग या दाम्पत्याचे पालकमंत्र्यांनी सांत्वन केले. तसेच येथील चौकाच्या उपाययोजनेकरीता उपोषण करणारे माजी सैनिक मनोज ठेंगणे यांचा त्यांनी सत्कार केला.

 

शुद्ध पेयजल संयंत्राचे लोकार्पण

 

आरो मशीनच्या माध्यमातून पडोली वासियांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पडोली ग्रामपंचायतीने मागणी केली होती. या गावातील नागरिकांना आरो मशीनच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी अल्पदरात उपलब्ध होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.