जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

 

चंद्रपूर, दि.  : जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांची जिल्हा युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.

 

शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणेच्या वतीने सन 2019-20,2020-21 व 2021-22 या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कारासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्यास 15 एप्रिल 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हिल लाईन, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

 

प्रति युवक व युवतीस पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 10 हजार असून संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रुपये 50 हजार असे आहे. पुरस्कारासाठी अर्ज करणारे युवक व युवती यांचे वय 1 एप्रिल 2019, 2020 व 2021 रोजी 13 वर्षे पूर्ण तर 31 मार्च 2020,2021 व 2022 रोजी 35 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असावे.

 

सदर युवक व युवती जिल्ह्यामध्ये 5 वर्ष वास्तव्यास असणे आवश्यक आहे. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफिती व फोटो आदी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. अर्जदार संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्ष कार्यरत असणे आवश्यक आहे. अर्जदार, संस्थेच्या सदस्याचा पोलिस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला देणे आवश्यक राहील.

 

जिल्ह्यातील समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग आदी बाबतचे कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य तसेच राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या आदीबाबतचे कार्य करणारे युवक व युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथून अथवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून (संकेतांक 201311121122043321) शासन निर्णयासोबत जोडलेला विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन आवश्यक कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहित मुदतीत सादर करावे, असे जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.