आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करा- जिल्हाधिकारी

आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करा- जिल्हाधिकारी

 

भंडारा दि.21: शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या नागरिकांनी गेल्या दहा वर्षांमध्ये आधारकार्डवरील माहिती POI (ओळखपत्र) तसेच POA (पत्त्याचा पुरावा) अद्ययावत केलेला नाही त्यांनी POI (ओळखपत्र) तसेच POA (पत्त्याचा पुरावा) अद्ययावत करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे आधारकार्ड तयार होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनी आपल्या आधारकार्डवरील माहिती त्वरित अद्ययावत करून घ्यावी तसेच ज्यांच्या आधार कार्ड वरील माहिती अचूक असेल त्यांनी सुद्धा आपले POI (ओळखपत्र) तसेच POA (पत्त्याचा पुरावा) अद्यावत करणे बंधनकारक आहे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणांर्तगत आधारकार्ड अद्ययावतीकरणाच्या कामासाठी नागरिकांनी नजीकच्या आधार कार्ड केंद्रावर जावे. शासनाने डेमोग्राफिक अपडेटसाठी (नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, ई- मेल) 50 रुपये तसेच बायोमेट्रिक अपडेटसाठी (हाताच्या बोटांचे ठसे, डोळ्यातील रेटीना स्कॅन) १०० रुपये शुल्क निर्धारित केले आहे. आधार केंद्रावर POI (ओळखपत्र) तसेच POA (पत्त्याचा पुरावा) EKYC करण्यासाठी ५० रुपये शुल्क निर्धारित केले आहे. तसेच नागरिकांनी स्वतः myAadhaar myaadhaar.uidai.gov.in पोर्टल वरून १५ मार्च ते १४ जून २०२३ या कालावधीत आधारकार्डवर POI (ओळखपत्र) तसेच POA (पत्त्याचा पुरावा) EKYC केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत व त्यानंतर २५ रुपये शुल्क आकारले जाईल.

 

आधारकार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाईल क्रमांक यासह अनेकदा एकापेक्षा अधिक आधारकार्ड नोंदणी झाली असल्याची शक्यता असते. आधारकार्डला संबंधितांची माहिती नोंद असल्याने या सर्व नोंदीचे अद्ययावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी दहा वर्षांनी आधार अद्ययावत करणे बंधनकारक केले आहे.

 

■ दहा वर्षे होऊनही अद्ययावत केले नाही, तर आधारकार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे भविष्यात मोठी गैरसोय होऊ शकते. यासाठी आधारकार्ड अद्ययावत करावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली.