‘कॅच द रेन’ मोहिमेबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. 20 : जलशक्ती अभियान अंतर्गत ‘कॅच द रेन’ मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जि.प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. बहुरीया, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, मनपा उपायुक्त अशोक गराटे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, केंद्र सरकार या अभियानचा नियमित आढावा घेत असल्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग व जलसंधारणाची झालेली कामे जलशक्ती अभियानच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी याची नोंद घ्यावी. जिल्ह्यात एकूण जलसंधारणाची किती कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच कृषी, सिंचन आणि वन विभागाकडे असलेल्या कामांची यादी तयार ठेवा. पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करावी. नवीन बांधकाम करण्यात येणा-या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा समावेश असणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.