मेंढा लेखा जिल्हयात आदर्श गाव करणार – जिल्हाधिकारी, संजय मीणा

रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मेंढा ग्रामसभेद्वारे राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन

मेंढा लेखा जिल्हयात आदर्श गाव करणार – जिल्हाधिकारी, संजय मीणा

गडचिरोली, दि.15: सामुदायिक वन अधिकार मान्यता प्राप्त गावाच्या ग्रामसभांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हामी योजनेंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 2021 मधे शासनाने मंजूरी दिली. यानंतर गडचिरोली जिल्हयातील मेंढा ग्रामसभेद्वारे नरेगातील कामे हाती घेण्यात आली. यातील कृषी गोदाम या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते व सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष मेंढा लेखा ग्रामसभा देवाजी तोफा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कृषी गोदाम बांधकामामधे 1.43 लक्ष रूपयांचे अकुशल, 27.01 लक्ष रूपयांचे कुशल व 5.57 लक्ष रुपयांचे साहित्य असे मिळून 34.02 लक्ष रूपयांचे काम आहे. विकेंद्रीत पद्धतीने गाव, टोला, पाडा हे घटक म्हणून नियोजन केले तर त्याचे चांगले व निश्चित परिणाम होतील तसेच गावातील नागरिक यात सहभागी होतील. या हेतूने रोजगार हामी योजनेंतर्गत सामुदायिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना अंमलबजावणी यंत्रणा म्हणून घोषित केले आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी भूमिपूजनावेळी गावकऱ्यांना गोदामाचे वेळेत काम पुर्ण करण्याचे आवाहन केले. जर हे काम वेळेत पुर्ण झाले तर समाज मंदिरासह रस्त्यांची कामे हाती घेवू असे आश्वासन दिले. त्यांनी उपस्थितांना गाव आदर्श करण्याची विचरणा केली असता सर्वानुमते होकार आला. यावेळी त्यांनी जिल्हयातील पहिले आदर्श गाव मेंढा लेखा करण्यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल असे आश्वासन दिले. तसेच याबाबत विविध कामांचा आंतर्भाव करून प्रस्ताव पाठविण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हयात सर्व प्रकारच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करणारे, लोकसहभाग असलेले एक गाव तयार झाल्यास त्यांचा आदर्श घेवून इतरही गावे समोर येतील.

या कार्यक्रमावेळी देवाजी तोफा यांनी गोदामाचे गावागावातील महत्त्व सांगून प्रत्येक गावात याची उभारणी झाल्यास शेतकऱ्यांना आपला माल तसेच वनउपज सुरक्षित साठवता येईल असे प्रतिपादन केले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा आता नरेगातही उत्तम कामे करतील व गावापासून सुरू झालेले हे काम देशभर जाईल असेही ते यावेळी म्हणाले. उपजिल्हाधिकारी रोहयो विजया जाधव यांनी ग्रामसभा अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्य करीत असतानाची प्रक्रिया लोकांना सांगितली. त्या म्हणाल्या, आता ग्रामसभांना स्वतंत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. आजपर्यंत 74 ग्रामसभांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी 49 ग्रामसभांचे लेबर बजेट तयार झाले असून एकूण 1633 कामांचे नियोजन करण्यात आले आहे. अकुशल 3046.3 लक्ष, कुशल 2124.30 लक्ष असे एकुण 5170.6 लक्ष रूपये तरतूद करण्यात आली आहे. एकुण 11.90 लक्ष मनुष्य दिन कामे नियोजित आहेत. ग्रामसभांचे वनउपज व कृषी माल साठवणूक करीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेतुन धानोरा तालुक्यातील 3 ग्रामसभेमध्ये 250 मेट्रीक टन क्षमतेचे कृषी गोडाऊन निर्मिती काम सुरु करण्यात आले असून राज्यातील हा प्रथम प्रकल्प आहे. आगामी तीन महिन्यात काम पुर्ण करण्याचा संकल्प असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, तहसिलदार धानोरा विरेंद्र जाधव, गट विकास अधिकारी श्री.टीचकुले, सरपंच श्रीमती दुगा व ग्रामसभेचे पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.