चंद्रपूर न्यायालयात लोक अभिरक्षक कार्यालय कार्यान्वित
Ø सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन
चंद्रपूर, दि. 13 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या सुधारीत विधी सेवा बचाव पक्ष प्रणाली 2022 नुसार दि. 11 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीमधील लोक अभिरक्षक कार्यालयाचे आभासी पद्धतीने उद्घाटन पार पडले. सदर कार्यालय दि. 13 मार्चपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयात उप-मुख्य विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणून अॅड. यशवंत गणवीर, तर सहाय्यक विधी सेवा बचाव पक्ष वकील म्हणून अॅड. अनुपमा फलके, अॅड. राजू मेले व अॅड. संजीवनी मोहरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
ज्याप्रमाणे फौजदारी प्रकरणांमध्ये फिर्यादी पक्षाची बाजू न्यायालयासमोर सरकारी वकील मांडतात त्याप्रमाणेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे फौजदारी प्रकरणांमध्ये मोफत विधी सहाय्य मिळण्यासाठी आरोपींनी केलेल्या अर्जानुसार उपरोक्त लोक अभिरक्षक कार्यालयातील वकिलांची नेमणूक केली जाईल. व ते बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडतील. या कार्यालयामार्फत मोफत विधी सेवा ही अटक होण्यापूर्वी पासून ते निकाल झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी दिली.