अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
गडचिरोली, दि.11: सर्व अन्न व्यवसायिक जसे की हॉटेल, रेस्टॉरंट, केटरींग, क्लब/कॅन्टीन, किराणा मालाचे किरकोळ व घाऊक विक्रेते, चायनिज, स्वीट मार्ट, आईस्क्रीम, पाणी पुरी विक्रेते, सुपर मार्केट, राईस/दाल मिल, आटा चक्की व इतर सर्व अन्नपदार्थ उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री करणाऱ्या आस्थापनांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे परिशिष्ट 4 अंतर्गत अन्न पदार्थ हाताळणी, साठवणूक, प्रक्रिया, वितरण व विक्री याबाबत प्रशिक्षण घेणे बंधनकारक केले आहे. सदर बाबतीत अन्न व्यवसायिकांमध्ये अन्न कायद्याविषयी जागरुकता निर्माण करुन व्यवसाय करण्यास सक्षम बनविण्याकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI), नवी दिल्ली यांनी प्राधिकृत केलेल्या स्वतंत्र Empannelled Agency मार्फत प्रशिक्षण देण्याची मोहिम संपूर्ण राज्यात सुरु आहे.
तरी सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली यांच्या वतीने वरील सर्व अन्न आस्थापनांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी दिनांक 15 मार्च 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता, पटेल मंगल कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण सत्रास कायदेशीर अन्न परवानासह हजर राहावे व प्रशिक्षण प्रमाणपत्र प्राप्त करुन लाभ घ्यावा असे अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म. राज्य), गडचिरोली यांनी कळविले आहे.