5 ते 11 जुलै कालावधीत अग्निवीर भरती रॅली
Ø भरती प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 मार्च
Ø 17 एप्रिल रोजी ऑनलाईन प्रवेश परीक्षा
चंद्रपूर, दि. 10 : भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे अग्निपथ ही योजना राबविण्यात येत असून त्याअंतर्गत सैन्य दलाच्या विविध विभागांमध्ये सेवा देण्याकरीता भारतीय तरुण उमेदवारांकडून चार वर्षाच्या सेवेकरीता अग्निवीर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी 15 मार्च 2023 पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती भारतीय सैन्य दलाच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या भरती प्रक्रियेकरीता दि. 17 एप्रिल 2023 रोजी ऑनलाईन प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेमध्ये प्राविण्य प्राप्त व पात्र उमेदवारांना अग्निवीर भरती रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेश पत्र मिळणार आहे.
तसेच दि. 5 ते 11 जुलै 2023 पर्यंत विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये (बुलढाणा वगळून) रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रवेश परीक्षेमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र प्राप्त होणार आहे. तरी, अग्निवीर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.