चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात जनऔषधी दिन

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात जनऔषधी दिन

 

चंद्रपूर, दि. 09 : जनऔषधी दिवस साजरा करण्याबाबत केंद्र शासनामार्फत आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री यांनी सूचना निर्गमित केल्या होत्या. त्याअनुषंगाने, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे जनऔषधी दिवस साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर जोरगेवार तर प्रमुख अतिथी म्हणून रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ.दाभेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, औषधी निरीक्षक श्री. डांगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

 

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, जेनेरिक औषधी अधिक स्वस्थ व चांगली असल्याने सर्व जनतेने याचा वापर करावा. तसेच सदर औषधी शासकीय रुग्णालयातच उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे गोरगरीब जनतेला बाहेरून औषधी घ्यावयाची आवश्यकता भासणार नाही. याबाबत आरोग्य यंत्रणेने दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांनी जेनेरिक औषधांचा अवलंब, प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.

 

प्रास्ताविकेत डॉ. रामटेके यांनी जनऔषधी दिनाचे महत्त्व व उद्दिष्टे उपस्थितांना पटवून दिले. डॉ. मंगेश गुलवाडे यांनी नागरिकांनी जेनेरिक औषधांचा वापर करावा, असे आवाहन केले. तर औषधी निरीक्षक श्री. डांगे यांनी जेनेरिक औषध व इतर औषधी यांची गुणवत्ता अगदी समान असल्याने आरोग्यासाठी या औषधांचा वापर करणे लाभदायक असल्याचे सांगितले.

 

सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, बाह्यसंपर्क व नर्सिंगची टिम यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या मेघा कुलसंगे यांनी तर आभार अधिपरीसेविका सुरेखा सूत्राळे यांनी मानले.