कृतीतुन स्त्रीयांना आदर द्यावा जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात महिलांचा सत्कार- गंगाधर जिभकाटे
भंडारा दि. 8: आई,बहिण,बायको व मुलगी या नात्यासोबतच महिला अनेक भुमिका जगत असतात. मुलांना घडवतांना आई देशाला घडवत असते.फक्त महिला दिनाला स्त्रीशक्तीचा जागर न करता कृतीतुन स्त्रीयांना आदर दिला पाहीजे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी आज सामाजिक न्याय भवनात आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सभापती स्वाती वाघाये, विशेष उपस्थितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते .
जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक न्याय सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील 500 हून अधिक महिला उपस्थित होत्या. नारी शक्ती महान आहे महिला आज विविध क्षेत्रात कार्यरत असून अगदी संसार सारथ्यापासुन त्या पायलट,वाहक, होवून आकाशी उंच झेपावत आहेत. आत्मविश्वासाने त्यांची भीती निघून गेली. मात्र अदयापही समानतेचा मोठा दीर्घ पल्ला बाकी असुन त्या दृष्ट्रीने समाज म्हणून सगळ्यांनी भुमिका बजावणे गरजेचे असल्याचे श्री.जिभकाटे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बाल विकास अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी केले.
यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सदस्य धुरपता मेहर, माहेश्वरी नेवारे, गायत्री वाघमारे, राजश्री तिघरे, अनिता नलगेापुलवार, सरीता कापसे, संगीता नवघरे, लता नरूले यांनी महिला दिनाच्या अनुषंगाने विचार मांडले. माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोळे, यासह उमेद, जिवनोन्नती अभियानाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या. यावेळी विविध क्षेत्रात गुणवत्तापुर्ण काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमीत्त तृणधान्याच्या पाककला प्रदर्शनाला जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनी भेट दिली. या महिला मेळाव्यात नृत्य, संगीतासह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळासह उमेदच्या महीला बचतगटांनी स्टॉल लावले होते. या स्टॉलमध्ये खादयपदार्थ, दागदागिने, यांच्यासह विविध कलाकुसरीच्या वस्तुंचेही प्रदर्शन लावण्यात आले होते.