महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार
Ø 15 मार्चपर्यंत इच्छुक व्यक्तीं आणि संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित
चंद्रपूर, दि. 06 : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार नियमावलीबाबतचा शासन निर्णय दि. 8 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयान्वये, राज्यातील वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाज संघटक व साहित्य क्षेत्रात काम करणारे कलावंत, साहित्यिक, समाजप्रबोधक, समाज प्रबोधनकार व समाजसेवक आदी महत्त्वाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी. जेणेकरून, समाजातील कलावंत साहित्यिक, समाज प्रबोधक, समाज प्रबोधनकार व समाजसेवक सरसावून पुढे येतील. याकरीता व्यक्तीसाठी-1 व सामाजिक संस्थांसाठी-1 असे एकूण 2 पुरस्कार देण्यात येणार आहे.
तरी, इच्छुक संस्था आणि व्यक्तींकडून महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्काराकरीता 15 मार्च 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाची नमुना प्रत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येईल, असे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी कळविले आहे.