रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे होणार पुनर्वसन Ø रस्त्यावर बालके आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचे होणार पुनर्वसन

Ø रस्त्यावर बालके आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 03 : सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल सुमोटो रीट याचिका 06/2021 नुसार रस्त्यावर राहणारे मुलांचे पुनर्वसन करण्याबाबत न्यायालयाने राज्यांना निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलाचा शोध घेण्याकरीता जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

 

या मोहिमेच्या आधी रस्त्यावर राहणारे मुले सापडण्याचे संभावित स्थळ याला हॉटस्पॉट घोषित करण्यात आले. जसे प्रकाश नगर, चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन, महाकाली मंदिर, बस स्थानक, दानववाडी, दाताळा पुलाजवळ, पागल बाबा नगर, नेहरूनगर, नेरी कोंडी, चंद्रपूर हा परिसर घोषित करून या मोहिमेअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी जिल्हा चाइल्ड लाईन चंद्रपूर, कनिष्ठ संरक्षण अधिकारी सर्व यांनी सदर क्षेत्रामध्ये शोध घेतला असता रस्त्यावर राहणारे बालके सापडले. या मुलांना बालकल्याण समिती समोर हजर करून त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी परत सर्व्हे करून चंद्रपूर जिल्ह्यात वरील श्रेणीतील बालके आढळल्यास त्यांचे पुनर्वसन करण्याकरीता महिला व बालविकास विभागाला सूचना दिल्या आहेत.

 

एक ते तीन श्रेणीनुसार रस्त्यावर राहणारे बालके आढळल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा चाईल्डलाईनचे हेल्पलाइन टोल फ्री क्र. 1098 वर कॉल करून माहिती द्यावी. जेणेकरून, जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे रस्त्यावर राहणाऱ्या बालकांना बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर हजर करून पुनर्वसन करण्याकरीता शासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.ज्या खाजगी संस्था रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनकरीता काम करण्यास इच्छुक असतील त्यांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, आकाशवाणी केंद्राच्या मागे, साईबाबा वार्ड, बांबू संशोधन केंद्र जवळ, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी दीपक बानाईत यांनी केले आहे.