पट्टे वाटपाची कारवाई लवकर होईल याचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी विनय गौडा

पट्टे वाटपाची कारवाई लवकर होईल याचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी विनय गौडा

 

चंद्रपूर २० फेब्रुवारी – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटपाचा लाभ लवकरात लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आढावा बैठकीत दिल्या.

चंद्रपूर महानगरपालिका राणी हिराई सभागृहात पट्टे वाटप तसेच महानगरपालिका क्षेत्रातील विविध विषयांची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. या प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त विद्या पाटील,उपअभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर व विभाग प्रमुख उपस्थीत होते.

चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत एकुण ३९ घोषित झोपडपट्टी असून सदर घोषित झोपडपट्ट्यांमध्ये अद्यावत सर्वेक्षणानुसार एकुण ११८८१ झोपडपट्ट्या असून ५९४८९ एकुण झोपडपट्टी धारक (लोकसंख्या) आहेत. मनपाकडून एकुण १४ शासकीय जमिनीवरील झोपडपट्टींचे अभिन्यास मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे मान्यतेकरीता व पट्टे वाटपाचे पुढील उचित कार्यवाहीकरीता सादर करण्यात आलेले आहे. उपरोक्त १४ अभिन्यासांमध्ये एकुण ४८१५ झोपडपट्टी धारक असून त्यापैकी शासन निर्णय दिनांक १७ नोव्हेंबर, २०१८ नुसार प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभ मिळण्यास पात्र झोपडपट्टी धारकांची संख्या ३८० इतकी आहे व त्यापैकी एकुण ८१ झोपडपट्टी अतिक्रमण धारकांची कागदपत्रे पट्टे वाटपाची पुढील कार्यवाहीस मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर करण्यात आल्याची माहीती याप्रसंगी मनपातर्फे देण्यात आली.

जिल्हाधिकारी यांनी बैठकीत मनपाच्या विविध विभागांच्या कामकाजाची माहीती जाणून घेतली तसेच विभागप्रमुखांचा परिचय करून घेतला .आयुक्त विपीन पालीवाल यांनी अमृत योजना व योजनेची प्रगती, मल निःसारण प्रकल्प,प्रधानमंत्री आवास योजना तसेच मनपाने सुरु केलेल्या विविध नाविन्यपुर्ण उपक्रमाची माहिती याप्रसंगी दिली.