हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर
19 फेब्रुवारीपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालय, क्षेत्रीयस्तरावर सार्वजनिक भागात मोहिमेचे आयोजन
चंद्रपूर, दि.18 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवार, दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात महारक्तदान शिबिर ही मोहीम राबविण्यात येत आहे.
रक्तदानाविषयी अनेकांना माहिती नाही. मात्र, तरीही समाजात अनेक गैरसमज रक्तदानाच्या बाबतीत कायम आहे. हे गैरसमज दूर व्हावे आणि रक्तदानाच्या माध्यमातून अपघातग्रस्त किंवा व्याधी पीडित व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नवा आनंद पुरविण्यासाठी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब कारणीभूत ठरू शकतो. रक्ताचा जास्तीत जास्त साठा उपलब्ध करणे आणि प्रत्येक गरजूला वेळेवर रक्त मिळावे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी रक्तदान शिबिर, विविध मेळावे आयोजित करण्यात येत आहे.
सदर महारक्तदान अभियान 19 फेब्रुवारीपासून राज्यभरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित रुग्णालयात तसेच क्षेत्रीय स्तरावर सार्वजनिक भागात आयोजित करण्यात येत आहे.नागरिकांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवून आपले अमूल्य असे रक्तदान करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.