पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
Ø 18 फेब्रुवारी रोजी विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश
चंद्रपूर, दि. 14 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभर साजरी केली जाते. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण 36 तसेच इतर ठिकाणी पुतळे आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अगोदरच्या दिवशी म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील शिवाजी महाराजांच्या स्मारकांची साफसफाई, रंगरंगोटी, स्मारकास फुलांची उत्कृष्ट सजावट, तसेच जयंतीदिनी छोटेखानी सांस्कृतिक समारंभ, पुष्पहार अर्पण करणे, सायकल व मोटार रॅली उपक्रम पार पाडण्यात येणार आहे.
सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने त्याचे योग्य व काळजीपूर्वक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर महानगर पालिका आयुक्त, नगर परिषद व नगर पंचायतीचे सर्व मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व कार्यालयीन विभाग प्रमुख आदींना दिले आहे.