यशकथा -4 शासनाच्या योजनांमधुन प्रगती साधलेल्या श्रीकांत सार्वे, यांच्या शब्दांत ऐकुया त्यांची यशोगाथा…….
· शेततळ्यातून साधली प्रगती…
भंडारा दि. 13 : मी श्रीकांत गिरिधारी सार्वे ग्रा.पं. हरदोजी तालूका मोहाडी माझ्याकडे 4 एकर कोरडवाहू शेती होती. फक्त खरीप हंगामात धान पीक घेत होतो. पाण्याची सुविधा नसल्याने दुबार पीक घेणे शक्य नव्हते. माझ्या आजोबांच्या नावावर जमीन होती माझे वडील व मी त्यावर काम करत होतो. आमच्या शेताला लागून नहर होते त्यामुळे आम्हाला सिंचन विहीर मिळू शकत नाही असे आम्हाला सांगण्यात येत होते. परंतु त्याकाळात शेततळे तयार करण्याबाबत शासनाकडून प्रसारित जाहिरात दिसून आली. त्यानुसार कृषी विभाग यांच्याकडून मागेल त्याला शेततळे व नरेगा योजनेतून सुद्धा शेततळे मिळू शकते याबाबत मला कळले.
जाहिरातीनुसार शेततळ्याची काय-काय फायदे आहेत हे मला कळले व आपल्या शेतावर सुद्धा आपण शेततळे घ्यावे जेणेकरून एक पाण्यामुळे धानाचे पीक मरत होते ते आपण वाचवू शकतो तसेच आपल्याला दुबार पीक घेता येणार यानुसार डोक्यात कल्पना पूर्णपणे रुजली. गावातील ग्राम रोजगारसेवक यांना मी आपल्याला नरेगा योजनेतून आपल्या शेतावर शेततळे मिळेल काय ? याबाबत विचारणा केली. ग्राम रोजगार सेवक यांनी याबाबत मला इंत्यभूत माहिती देऊन आपण नियोजनात नाव सामाविस्ट करून कागदपत्राची पूर्तता करावी असे सांगितले. मी सर्व कागदपत्र पूर्तता करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती येथे तांत्रिक व प्रशासकीय मान्यतासाठी प्रकरण फाईल सादर करण्यात आली. त्यानुसार शेततळे कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. त्यानुसार मी आपल्या शेतात शेततळे नरेगा योजनेतून बांधण्यास सुरवात केली.
शेततळे घेतल्यावर आपणास दुबार पिके घेणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. धानशेती न करता आपण भाजीपाला, ऊस मुंग यासारखी पैसा देणारी पिके घेऊन आपण आपल्या कुटूंबाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करता येणार हि कल्पना उद्यास आली.
शेततळे घेतल्यावर मला आपत्कालिन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध झाले, पावसाच्या खंडकाळात हे शेततळे पिकांसाठी वरदान ठरले, पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होतांना दिसली, भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होताना दिसले, मत्स्य संवर्धनासाठी उपयोग झाला, शेतीला संरक्षित सिंचनाची सोय झाली.
शेततळ्यातील पाणी हे माहे मे महिन्यापर्यंत साठवून राहते. उत्पन्नाच्या आधारे मी शेतात बोअरवेल खोदलेली आहे. त्यानुसार सुद्धा शेततळ्यात पाणी सिंचित करण्यात येते. ज्यावेळेस शेतालगत असलेल्या शासनाद्वारे नहरामध्ये पाणी सोडण्यात येते त्यावेळेस नहरातील पाणी हे शेततळ्यात टाकण्यात येत. मत्स्यपालनासाठी सुद्धा स्वच्छ पाण्याची आलटा पालट करण्यात येते.
मी जर त्यावेळेस शेततळे तयार केले नसते तर आज इतके उत्पन्न मिळाले नसते व कुटूंब समृद्ध झाले नसते. कुटूंब समृद्धी मध्ये शेततळी चा सर्वात मोठा सहभाग आहे. शेतात आता तीन हंगामात पिके घेतो. शेती सोबत मला पूरक व्यवसाय करता यावा या करिता यावर्षी नरेगा योजनेतून शेळी शेड घेतले आहे. मला शेळ्यांचा व्यवसाय करावयाची खूप आवड निर्माण झाली आहे. पुढील वर्षी एक एकर शेतीमध्ये कृषी विभागा मार्फत सलग फळबाग घेणार आहे व त्यात मुक्त संचार पद्धतीने कुक्कुट पालन घेण्याचा मानस आहे. ठिबक सिंचनासाठी कृषी विभागामार्फत ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे. यापुढे शेती हि ठिबक सिंचना वर करणार आहे. माझ्या भागातील तरुण शेतकरी यांनी धान शेतीस बगल देऊन शास्वत उत्पन्न देणारी पिके घेण्याबाबत प्रवृत्त व्हावे. भाजीपाला, फळपीक, पूरक व्यवसाय दूध उत्पादन, शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी व्यवसायाची कास धरावी.