पाळीव प्राणी विक्रेत्यांनी दुकानांची नोंदणी करणे अनिवार्य- जिल्हाधिकारी
भंडारा दि. 10: महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनीयम अंतर्गत जिल्ह्यातील पाळीव प्राणी विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानांची नोंदणी संबंधीत ग्रामीण अथवा शहरी भागात करणे अनिवार्य आहे. याबाबतीत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळीव प्राणी दुकान व पाळीव प्राण्यांचे प्रजनन करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत दिले.
प्राणी क्लेश कायद्यान्वये जनावरांची वाहतुक करतांना वाहतुकदाराने संबंधीत क्षेत्रातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्याकडून प्राणी, जनावरे यांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र सोबत ठेवावे. तसेच दुधाळ, भाकड, प्रजननक्षम, अपंग व इतर अशा सर्व प्रकारच्या गायी, वासरे, वळू, बैल, म्हशी व रेडे यांच्या हत्येस बंदी आहे.
अनावश्यक वेदनादायी पध्दतीने प्राण्यांना हाताळणे किंवा वाहनातून घेवून जाणे, विनाकारण जास्त वेळ प्राण्यांना साखळीने बांधून ठेवणे, आखूड अवजड साखळी/दोरी यानी प्राण्यांना बांधून ठेवण्याकरिता अवलंब करणे, श्वानाचे पालक म्हणून श्वानांना विनाकारण बांधून ठेवणे व त्यांचे व्यायामाकडे दुर्लक्ष करणे, अनावश्यक क्रुर पध्दतीने (श्वानांसह) प्राण्यांना ठार मारण्यास बंदी, ज्यादा दुध उत्पादन करिता ऑक्सिटोसीन इंजेक्शन देण्यास मनाई आहे. मनोरंजनाचे कार्यक्रम करिता प्राण्यांचा उपयोग करणे, प्राण्यांचा जुगारासाठी, झुंजी लावण्यासाठी वापर करणे/ जागेच्या वापरास परवानगी देणे, कैद असलेल्या प्राण्यांचा निशानेबाजीअथवा तत्सम स्पर्धांकरिता वापर करणे. या बाबीं प्राणी क्लेश अंतर्गत प्रतिबंधित असून याचे उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद आहे.