10 फेब्रुवारी पासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम
गडचिरोली, दि.08:- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिम गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी व आरमोरी या तालुक्यात दिनांक 10 फेब्रुवारी ते दिनांक 20 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे.सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत राज्यातील हत्तीरोगासाठी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयात डी.ई.सी. व अल्बेंडाझोल गोळया सोबतच आयव्हरमेक्टीनची तिसरी मात्रा गरोदर माता, 5 वर्षा खालील बालके व गंभिर आजारी रुग्ण वगळून देण्यात येणार आहे.वरील औषधांचे सेवन केल्याने हत्तीरोगाचे जंतू नष्ट होतात.ही औषधी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष खाणे आवश्यक आहे.
जिल्हयात हिवताप खालोखाल हत्तीरोगही महत्वाची सार्वजनिक आरोग्याची समस्या आहे. यारोगामुळे रोग्यास अपंगत्व येऊन आर्थिक उत्पनावरही परिणाम होतो. विदृपता व अपंगात्वामुळे रुग्णांना लोकांमध्ये मिसळणे त्रासदायक होते.
हत्तीरोगाचा प्रसार:- हत्तीरोग ( हत्तीपाय) हा एक सुतासारखा (मायक्रोफायलेरिया) कृमीमुळे होणारा रोग असून याचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. याडासाची पैदास उघडी गटारे,डबकी,घाण पाण्यात होते. क्युलेक्स डासाची मादी मनुष्याला चावल्यामुळे हत्तीरोगाच्या कृमीचा शरीरात प्रवेश होऊन 8 ते 18 महिन्याच्या कालावधीत पुढील लक्षणे दिसून येतात. लोकांना बाहृय दृष्टीने बरे वाटत असले तरी त्यांचे शरीरात हत्तीरोगाचे परजीवी जंतू असू शकतात.
लसिका ग्रंथिचा हत्तीरोग:- लसिकाग्रंथी/लसिका वाहिण्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास किंवा ईजा झाल्यास त्यातील लसिचा द्रव अवयवामधून निट वाहू शकत नाही. व तो शरीराच्या विशिष्ट भागामध्ये साचतो.(हात व पाय ) हा अडथळा हत्तीरोगाच्या जंतूमुळे झाला असेल तर त्यास लसिकाग्रंथी/लसिकेचा हत्तीरोग असे म्हणतात.यात शरीरातील विविध अवयावांवर लसिका द्रव साचल्यामुळे सूज येते उदा.वक्षस्थळे,पुरुष व स्त्रीचे गुप्त अवयव,हात,पाय,जसजसा कालावधी वाढत जातो तसतसी विदृपता वाढत जाऊन रुग्णाला शारीरीक त्रास सहन करावा लागतो.गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी, आरमोरी तालुक्यातील अंडवृध्दी व हत्तीपाय रुग्ण पुढील प्रमाणे :- चामोर्शी तालुका-अंडवृध्दी रुग्ण- 141,व हत्तीपाय रुग्ण -972, आरमोरी तालुका:- अंडवृध्दी रुग्ण-60, हत्तीपाय रुग्ण – 851 आहे. असे जिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.