काजू पिक-कीड व रोग व्यवस्थापन सल्ला (हॉर्टसॅप) योजना “काजू पिक”सन 2022-23

काजू पिक-कीड व रोग व्यवस्थापन सल्ला (हॉर्टसॅप) योजना “काजू पिक”सन 2022-23

 

गडचिरोली, दि.03: कोकण किनारपट्टीलगत या आठवड्यातसुद्धा थंडीचा प्रभाव कमी प्रमाणात असून काही ठिकाणी हवामान ढगाळ व दाट धुक्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बऱ्याच काजू बागा मोहोरवफळधारणेच्या अवस्थेमध्ये असून शेतकरी वर्गाने आपल्या काजू बागांचे नियमितपणे कीड-रोगाचे सर्वेक्षण करून त्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर जाणार नाही याची काळजी घेऊन खालील उपाययोजना करून काजू मोहोर,काजू बोंडू व बियांचे संरक्षण करावे.धुक्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे,त्यामुळे बुरशीनाशकांचा वापर आवश्यकता असल्यास करावा.काजूपिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

काजू पिक एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन

 

ढेकण्या (टी मॉस्किटो बग ) :- बागेचे वेळोवेळी सर्वेक्षण करून नवीन मोहोर/फळ यांची पाहणी करावी. मोहोर/बिया काळपट आढळल्यास किंवा प्रादुर्भाव 5% पेक्षा जास्त दिसून आल्यास विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार प्रोफेनोफॉस 10 मिली (मोहोर फुटल्यावर) किंवा अॅसिटामिप्रिड 5 मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रिन 6 मिली प्रति 10 लिटर (फळधारणा अवस्था) पाण्यातून यापैकी एका कीटकनाशकांची फवारणी करावी. थंडीच्या महिन्यात लिकॅनीसियम लिकॅनी या जैविक बुरशीचा वापर 5ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

फुलकिडी:- मोहोर/काजू बी व बोंडूवर भुरकट रंगाचे चट्टे आढळल्यास अथवा बियांचा आकार वेडावाकडा झालेला आढळल्यास किंवा प्रादुर्भाव 10 फुलकिडी प्रती मोहोर/काजू बी व बोंडूवर दिसून आल्यास विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार जर ढेकण्या नियंत्रणासाठी फवारणी केली असल्यास वेगळे किटकनाशक वापरण्याची गरज नाही. थंडीच्या महिन्यात लिकॅनीसियम लिकॅनी या जैविक बुरशीचा वापर 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

खोडकिडा:-बाग स्वच्छ ठेवावी व झाडांची ठराविक कालावधीने व्यवस्थित पाहणी करावी. झाडाला कीड लागलेली आढळून आल्यास पटाशीच्या सहाय्याने साल काढून शक्य तेवढ्या अळ्या काढून नष्ट कराव्यात.प्रादुर्भावामुळे मेलेली किंवा संपूर्ण पिवळी पडलेली झाडे मुळासकट खणून काढून अळी व कोष यांचा नायनाट करावा.प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेत असतानाच प्रादुर्भित खोडाची साल काढून आतील अळ्या नष्ट कराव्यात व नुकसानग्रस्त भाग तसेच झाडाचा बुंधा व माती क्लोरपायरिफॉस 25 मि.लि. किंवा फिप्रोनिल 10 मि.लि. प्रति 5लिटर पाण्यात मिसळून भिजवावा.

काजू बोंडू व बी पोखरणारी अळी :- लॅम्डा सायहॅलोथ्रिन 6 मिली प्रति 10 लिटर (फळधारणा अवस्था) पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर ढेकण्या नियंत्रणासाठी तिसर्या फवारणी दरम्यान वरील कीटकनाशक वापरले असल्यास पुन्हा वापरूनये.

करपा रोग:- करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड 20 ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस 10 मि. लि. किंवा अॅसिटामिप्रिड 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून यांची मिश्र फवारणी करावी. किंवा 1% बोर्डोमिश्रणाची फवारणी करावी.

टीप:-पॉवर स्प्रेयरने फवारणी करताना कीटकनाशकाचे प्रमाण दुप्पट घ्यावे. फवारणी शक्यतो सकाळी 10.00 वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी 4.00 वाजल्यानंतर करावी. सतत एकाच कीटकनाशकाचा वापर टाळा.

फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टॉप), यांच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना काजू पिकावरील किड व रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळीउपाययोजना सुचविण्यात येत असतात अशा उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेवर करावी असे आवाहन डॉ.कैलास मोते, संचालक, फलोत्पातदन यांनी केले आहे.