अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाई अनुदानाचे तत्काळ वितरण करावे- मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 31 : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या अनुदान वितरणाबाबत आढावा घेवून नुकसान भरपाईच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी निर्देश दिले.
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी देण्यात आलेल्या निधीचे वितरण करण्याबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ६५ मिमीपेक्षा कमी, परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत निकष ठरवण्यासाठी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने निकष तयार केल्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला आमदार दीपक चव्हाण, अपर मुख्य सचिव नितीन करीर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित अधिकारी उपस्थित होते.