गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा..जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज आमंत्रित

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा..जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज आमंत्रित

 

भंडारा, दि 20 : नवोदय विद्यालय समिती कडून शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी निवड चाचणीद्वारे जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2023 आहे. तर 29 एप्रिल 2023 रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांना येत्या 31 जानेवारीपर्यंत https://navodaya.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावेत. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय (पाचगाव) चे प्राचार्य एम. एस. बलवीर यांनी केले आहे.

 

राज्यातील नवोदय विद्यालयांमध्ये फक्त सहावीच्या वर्गात प्रवेश घेता येतो. यासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गात असतांनाच निवड चाचणी परीक्षेला बसावे लागते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणानुक्रमानुसार हे प्रवेश दिले जातात. विद्यार्थ्यांना येत्या 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

 

1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोदय विद्यालयांची स्थापना केलेली आहे. यानुसार केंद्र सरकारच्या वतीने नवोदय विद्यालय समिती स्थापन केलेली आहे. या स्वायत्त यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मुलां-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. या विद्यालयांमधील विद्यार्थ्यांना दहावी व बारावी परीक्षेसाठी केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई बोर्ड) असते. भंडारा जिल्ह्यात पाचगाव (वरठी) ता. मोहाडी येथे नवोदय विद्यालय आहे.

 

इयत्ता आठवीपर्यंत मातृभाषा किंवा क्षेत्रीय स्तरावरील भाषेतून हे शिक्षण दिले जाते. या विद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत पूर्ण होते. या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत भोजन, निवास, गणवेश आणि वह्या-पुस्तके मोफत पुरविली जातात. मात्र, नववीपासून पुढे दरमहा प्रत्येकी 600 रुपये एवढे नाममात्र शुल्क विद्यालय विकास निधी म्हणून आकारले जाते. या नाममात्र शुल्कातून सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना वगळले आहे.

 

निवड चाचणीसाठी पात्रता निकष

 

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे. त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा. जिल्ह्यातील मान्यता प्राप्त सरकारी-निम सरकारी अथवा खाजगी शाळेत संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र 2022-23 मध्ये इयत्ता पाचवी शिकत असला पाहिजे. इच्छुक विद्यार्थी तिसरी, चौथी व पाचवी सलग उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2011 पूर्वी आणि 30 एप्रिल 2013 नंतर झालेला नसावा. ग्रामीण भागाच्या आरक्षित कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची तिसरी, चौथी व पाचवी ग्रामीण शाळेतून पूर्ण झालेली असावी. जर विद्यार्थी इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीत पैकी किमान एक दिवस जरी शहरी शाळेतून शिक्षण घेतलेले असेल तर तो अर्ज शहर भागातून आहे असं समजल जाईल.