हंसराज अहीर यांच्या यशस्वी मध्यस्थीने कोलगाव शिवारातील 350 हेक्टर शेतजमिनींचे वेकोलिव्दारा लवकरच अधिग्रहण
प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्ष भेटून मानले अहीरांचे आभार
चंद्रपूर :- वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील युजी टू ओसी धोपटाळा प्रकल्पातील कोलगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या सुमारे 350 हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण मागील काही वर्षांपासून वेकोलि प्रबंधनाने थांबविले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना वेकोलि कोळसा उत्खनन, ओव्हरबर्डन तसेच वेळोवेळी उद्भवणाऱ्या भीषण पुरामुळे शेतीची मशागत करणे कठिण झाले होते. त्यामुळे वेकोलि व पुराच्या तडाख्यामुळे प्रभावित या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचेकडे संबंधित शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. सदर मागणीची दखल घेत त्यांनी वेकोलि मुख्यालयात या विषयी अनेकदा बैठका घेवुन हा विषय यशस्वी मध्यस्थीने मार्गी लावला प्रस्तावित खाणीच्या उत्तर-पश्चिम ( नॉर्थ वेस्ट) प्रकल्प अहवालात कोलगाव शिवारातील शेतजमिनी अधिग्रहीत करण्याचे वेकोलि प्रबंधनाने मान्य केल्यामुळे या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. जवळपास साडे तिनशे हेक्टर अधिग्रहण वंचित असलेल्या या जमिनी 90 टक्के इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या आहेत. कोलगाव आणि कढोली येथील शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. प्रदुषण आणि पूराच्या माऱ्यामुळे या जमिनी नापिक झालेल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी कास्त करणे शक्य होत नव्हते. या विषयाला घेवून हंसराज अहीर यांनी क्षेत्रीय कार्यालय, वेकोलि मुख्यालयास सतत पत्रव्यवहार केला. वेकोलि चे सीएमडी यांच्यासोबत अनेकदा बैठका घेतल्या व हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. कोलगाव चे सरपंच पुरुषोत्तम लांडे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, जि. प. चे माजी सभापती सुनिल उरकुडे, अॅड. प्रशांत घरोटे व मधुकर नरड यांच्या नेतृत्वात कोलगाव शिवारातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांनी हंसराज अहीर यांची निवासस्थानी भेट घेवून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार मानले. या प्रकल्पग्रस्तांमध्ये अक्षय निब्रड, गणेश लांडे, प्रशांत मोरे, श्यामराव दिवसे, रमेश उरकुडे, संजय किंगरे, सागर उरकुडे, शंकर सातपूते, सुरज ढवस, महेश ढवस, भूषण दिवसे, रामदास मोरे, राजु पिंपळकर, अनिल दिवसे, नानाजी गाढवे, रुपेश पिंपळकर, विजय झाडे, अविनाश वैद्य आदींचा समावेश होता.