भंडारा जिल्ह्यात सर्व पशुंचे बाजार व पशुंच्या शर्यतीकरीता परवानगी – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
भंडारा, दि. 3 : जिल्ह्यात सर्व पशुंचे बाजार व पशुंच्या शर्यतीकरीता नियमाच्या अधिन राहून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी परवानगी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव आढळून आल्यामुळे शासन अधिसूचनेनुसार गुरांचे बाजार मागील 12 सप्टेंबर 2022 पासून बंद करण्यात आलेले आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्र लम्पी चर्मरोगाने बाधित झालेला आहे. ह्या रोगामुळे गोवंशीय जनावरे बळी पडत आहेत व मर्तुकी सुद्धा होत आहेत. परंतु म्हैस वर्गीय जनावरांमध्ये हा रोग आढळून न आल्यामुळे शासन अधिसूचना 21 नोव्हेंबर 2022 नुसार म्हशीचे बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या फारच कमी असल्यामुळे व पशुपालकांचे आर्थिक हीत लक्षात घेता पशुंचे बाजार व पशुंचे शर्यती करिता तसेच जनावरांची वाहतूक करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी जिल्हा स्तरीय समितीचा आढावा घेऊन मान्यता दिलेली आहे.
वाहतुकीकरीता जनावरांचे 28 दिवसांपुर्वी लसीकरण झालेले असावे, गुरांची ओळख पटविण्यासाठी कानात Tag नंबर व INAPH पोर्टलवर नोंदणी असावी, जनावरांच्या आरोग्य प्रमाणपत्रावर पशुधन विकास अधिकारी यांची स्वाक्षरी असलेली असावी, जनावरे वाहतूक अधिनियम 2009 मधील नियम क्र.47 अन्वये स्वास्थ प्रमाणपत्र (Proform for Certificate of Fitness to travels cattle) सोबत असावे. सोबतच पशुंचे शर्यतीसाठी अटीं व शर्ती नुसार पालन करणे अनिवार्य असेल. जनावरांचे बाजार पूर्वी प्रमाणेच परंतु वरील अटी नुसार भरविण्यास व जनावरे वाहतुकीस भंडारा जिल्ह्यात परवानगी जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी प्रदान केलेली आहे.