प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

 

चंद्रपूर, दि. 03 : महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, 1995 अन्वये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार राज्यात गोवंश हत्या बंदी अमलात आली आहे. या अधिनियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी यासंदर्भात मंगळवारी आढावा बैठक घेतली.

 

वीस कलमी सभागृह येथे आयोजित या बैठकीला उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जि.प.पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर, चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुवर्णा चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण, मनपा उपायुक्त श्री. गराटे आदी उपस्थित होते.

 

बेकायदेशीर पशुंची वाहतूक करतांना पोलिसांमार्फत पकडण्यात आलेल्या पशुंचे संगोपन करण्यासाठी गोशाळांना पुशंचे हस्तांतरण करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. त्यानुसार अवैधरित्या वाहतूक करतांना जप्त करण्यात आलेल्या पशुंच्या संदर्भात पोलिसांकडून संबंधितांविरुध्द तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत कायद्यातील तरतुदींचे योग्य पालन करण्यात यावे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या पशुंची पशुवैद्यकीय अधिका-याकडून आरोग्य तपासणी करून पशुस्वास्थ दाखला त्याच दिवशी घेण्यात यावा. गुन्हा दाखल केल्याशिवाय कोणतही पशु गोशाळेला देण्यात येऊ नये.

 

जप्त करण्यात आलेले पशु गोशाळेत विहित प्रक्रिया अवलंबून पाठवावेत. गोशाळेत पायाभुत सुविधा असल्याची तसेच गोशाळेच्या पदाधिका-याविरुध्द गुन्हा दाखल नसाल्याची खात्री करून घ्यावी. जप्त करण्यात आलेल्या पशुंचे संगोपन करण्याची जबाबदारी गोशाळा प्रशासनाची राहील. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे सदस्य सचिवांच्या लेखी परवानगी शिवाय जप्त करण्यात आलेल्या पशुंचे इतर व्यक्ती / संस्थांकडे हस्तांतरण करता येणार नाही. तसेच शेतक-यांना वापरण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

 

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात प्रत्येक पोलिस स्टेशननुसार यासदंर्भात किती गुन्हे दाखल आहेत व ते कोणत्या भागात सर्वाधिक आहेत, याचे योग्य वर्गीकरण करावे. जिल्ह्यातील गो शाळांची यादी अद्ययावत ठेवा. प्रत्येक महिन्यात जिल्ह्यात अशा किती घटना घडतात, त्याची नोंद ठेवावी. जिल्हा प्राणी क्लेष समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासंदर्भात पोलिस विभागाकडे चारित्र्य पडताळणी अहवाल प्रलंबित असल्यास तो तातडीने देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

 

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या गोशाळा : प्यार फाऊंडेशन (चंद्रपूर), गोशाळा चुनाळा (ता. राजुरा), गोविंद गोशाळा गोरक्षण संस्था (हळदा, ता. ब्रम्हपुरी), उज्वल गोरक्षण संस्था (लोहारा), जय श्वेतांबर तीर्थ गोशाळा (भद्रावती), श्रीकृष्ण गोशाळा (तोहोगाव, ता. गोंडपिपरी) आणि भारतीय गोरक्षण व गोशाळा संस्था (तळोधी बा. ता, नागभीड)