4 ते 8 जानेवारीला जिल्हा कृषी महोत्सव Ø तांदुळाचे विविध वाण मुख्य आकर्षण Ø नागरिकांनी लाभ घ्यावा

4 ते 8 जानेवारीला जिल्हा कृषी महोत्सव Ø तांदुळाचे विविध वाण मुख्य आकर्षण Ø नागरिकांनी लाभ घ्यावा

 

नागपूर, दि. 27 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या एच.एम.टी. जयश्रीराम, चिन्नोर, काळा तांदूळ, पिकेव्ही-तिलक आदी उच्चप्रतीचा तांदूळ ग्राहकांना शेतकऱ्यांमार्फत थेट विक्री करण्यात येत आहे. जिल्हयातील तांदूळ उच्च गुणवत्तेसाठी संपूर्ण देशात प्रसिध्द असून शेतकरी अत्यंत कष्टाने घाम गाळून धान उत्पादन करतो. परंतू तांदूळ विक्रीतून मोठा नफा मात्र व्यापारी कमवितात. शेतक-यांनीच उत्पादीत केलेला तांदूळ थेट ग्राहकांना विकल्यानंतर ग्राहकांनाही बाजारभावापेक्षा कमी दरात उच्च प्रतीचा तांदूळ उपलब्ध होणार व शेतकऱ्यांनाही योग्य किंमत मिळणार आहे. यासाठी प्रकल्प संचालक (आत्मा) व कृषी विभागातर्फे जिल्हा कृषी महोत्सवांतर्गत धान्य महोत्सवाचे आयोजन कृषी महाविद्यालय वसतिगृह,रामदासपेठ, नागपूर येथे 4 ते 8 जानेवारी या कालावधीत सकाळी 10 ते रात्रौ 9.30 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

 

तांदूळ विक्री महोत्सवासोबतच संत्रा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील जगप्रसिध्द नागपूरी संत्री थेट शेतकऱ्यामार्फत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहे. महोत्सवात, सुप्रसिध्द “भिवापूर मिरची पावडर” आणि सेंद्रिय तांदूळ, संत्रा, हळद व इतर सेंद्रिय शेतमाल विक्रीकरीता राहणार आहे.

 

विविध महिला गटांनी तयार केलेले पदार्थ जसे लोणचे, पापड, मसाले, हळद, कच्चे घाणीचे तेल, विविध जिल्हातील उत्पादीत होणारे विविध फळे तसेच विदेशी भाजीपाला उदा. ब्रोकोली, जांभळी कोबी, रेशीम कपडे व साडया आदी विक्रीकरीता राहणार आहे. या महोत्सवात शेतक-यांबरोबर ग्राहकांना सुध्दा फायदा होणार आहे.

 

ग्राहक,अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभाग व आत्मा यांच्याकडून करण्यात आले आहे

 

अधिक माहितीसाठी प्रभाकर शिवणकर- 9422133744, अमित डोंगरे – 8623059219 प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय याचेशी संपर्क साधावा.