अन्न, नागरी पुरवठा सचिव विजय वाघमारे यांनी जाणून घेतल्या राईस मिलर्सच्या समस्या
– भरडाईची गती वाढविण्याचे आवाहन
भंडारा दि.27: अन्न,नागरी पुरवठा सचिव विजय वाघमारे यांनी नुकत्याच जिल्हयातील सर्व राईस मिलर्सच्या संघटनेतील सभासदांशी संवाद करून समस्या जाणून घेतल्या.
किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेतंर्गत जिल्हयामध्ये नोव्हेंबर 2022 पासून धान खरेदीची सुरूवात झाली आहे.25 डिसेंबर 2022 अखेर सुमारे 26 लक्ष क्विंटल किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेतंर्गत धान खरेदी झाली आहे. या धानाच्या भरडाई संदर्भात राईस मिलर्सच्या अडचणी जाणून घेण्यासंदर्भात नियोजन भवन येथे सचिव दिनेश वाघमारे (अन्न् व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण )विभागाच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत नागपूर,भंडारा,गोंदीया,चंद्रपूर व गडचिरोली येथील राईस मिलर्स सहभागी झाले होते.यावेळी सचिव श्री.वाघमारे यांनी राईस मिलर्सच्या अडचणी जाणून घेतल्या.व यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.सर्व राईस मिलर्सना प्रमाणित संचालन प्रक्रीयेनुसार कामकाज करून भरडाईची गती वाढवण्याचे आवाहन केले.लवकरात लवकर भरडाई करून तांदूळ गोदामात जमा करण्याच्या राईस मिलर्स यांना सुचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,पुरवठा उपायुक्त रमेश आडे,आदिवासी विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विपणन जे.एस.राठोड तसेच नागपूर विभागातील सर्व पाचही जिल्हयाचे जिल्हा पुरवठा अधिकारी,मार्केटींग फेडरशेनचे जिल्हा पणन अधिकारी,आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक उपस्थित होते.